
बेळगाव : “पायोनियर बँक ही बेळगाव जिल्ह्यातील सर्वात जुनी बँक असून या बँकेने गेल्या काही वर्षात जी उल्लेखनीय प्रगती केली आहे ती कौतुकास्पद आहे. आपल्या बँकेने मायक्रो फायनान्स देण्याची जी नवीन योजना आखली आहे ती फारच चांगली आहे” असे विचार आंतरराष्ट्रीय कृषी अर्थतज्ञ आणि केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालय नवी दिल्ली, एशियन डेव्हलपमेंट बँक व स्टार्ट अप इंडिया यासारख्या अनेक संस्था संघटनांचे सल्लागार डॉ. परशराम पाटील यांनी बोलताना व्यक्त केले. गोव्याहून बेळगावमार्गे कोल्हापूरला निघालेल्या डॉ. पाटील यांनी नगरसेवक रवी साळुंखे यांच्या समवेत शुक्रवारी पायोनियर बँकेला सदिच्छा भेट दिली.
संस्थेचे चेअरमन श्री. प्रदीप अष्टेकर यांनी त्यांचे शाल, पुष्पगुच्छ व भेटवस्तू अर्पण करून स्वागत केले. डॉ. पाटील हे गुडेवाडी तालुका चंदगडचे रहिवासी असून आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कृषी अर्थतज्ञ आहेत. त्यांचा परिचय बँकेचे संचालक अनंत लाड यांनी करून दिला.
आपल्या सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करून डॉक्टर पाटील म्हणाले की, “आपल्या देशात राष्ट्रीयकृत बँकांचा मोठा प्रभाव असूनही नागरी पातळीवर आणि ग्रामीण भागात सहकारी बँका चांगले कार्य करीत आहेत. भारताला पुढे न्यायचे असेल तर शेती, सहकार आणि ग्रामीण विकास यांना धरूनच पुढे गेले पाहिजे. हे धोरण सध्याच्या सरकारचे असून सहकाराशिवाय विकास शक्य नाही हे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी व सहकार मंत्री अमित शहाजी हे जाणून आहेत. सहकार मंत्रालयाचे नेतृत्व करणारे शहा यांना देशाला जगात आर्थिक महासत्ता बनवण्यासाठी वाटचाल सुरु ठेवली आहे. शेती व सहकार यांची सांगड घातल्याशिवाय देशाचा विकास होणार नाही हे लक्षात घेऊन ते दोघे कार्य करीत आहेत असेही डॉक्टर पाटील म्हणाले. ‘पुढील महिन्यात या भागात आम्ही सहकार व बँकिंग क्षेत्रावरचे एक राष्ट्रीय चर्चासत्र ठेवणार असून त्यामध्ये सहकार क्षेत्रातील मान्यवर भाग घेणार आहेत सहकार क्षेत्राच्या समस्या आणि पुढील वाटचाल याबाबत तेथे चर्चा होईल, असेही त्यांनी सांगितले. संचालकांशी झालेल्या चर्चेप्रसंगी त्यांनी बेळगाव आणि चंदगड या दोन्ही तालुक्यांचे असलेले आपुलकीचे नाते अधोरेखित केले.
प्रारंभी बँकेच्या सीईओ अनिता मूल्या यांनी प्रास्ताविक केले तर चेअरमन प्रदीप अष्टेकर यांनी बँकेच्या प्रगतीचा आढावा घेतला. बँकेचे व्हाईस चेअरमन रणजीत चव्हाण पाटील यांनी आभार मानले.
याप्रसंगी बँकेचे संचालक सर्वश्री शिवराज पाटील, रमेश शिंदे, ग. म. पाटील, रवी दोडन्नवर, गजानन ठोकणेकर, विद्याधर कुरणे, सौ. सुवर्णा शहापूरकर आदी उपस्थित होते यावेळी झालेल्या चर्चेत सर्वानी भाग घेतला.
Belgaum Varta Belgaum Varta