कागवाड : देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या व आपल्या प्राणांची आहुती देणार्या देशभक्तांना आणि सीमेचे रक्षण करताना शहीद झालेल्या जवानांना आदरांजली अर्पण करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे, असे प्रतिपादन माजी मंत्री व कागवाडचे आमदार श्रीमंत पाटील यांनी केले.
कागवाड तालुका प्रशासनाच्यावतीने सोमवारी कागवाड येथील शिवानंद महाविद्यालयाच्या प्रांगणात तालुका प्रशासन, नगरपंचायत, शिवानंद महाविद्यालय, गट शिक्षणाधिकारी कार्यालय व इतर शासकीय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने 75 वा स्वातंत्र्य अमृत महोत्सव सोहळा झाला. त्यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
आ. पाटील म्हणाले, वारा, पाऊस, थंडी याची तमा न बाळगता रात्रंदिवस सीमेवर रक्षण करणार्या जवानांची आणि देशाला अन्न देणार्या शेतकर्यांची सेवा अनमोल आहे. जय जवान जय किसान या तत्वाने भारत प्रगतीच्या मार्गावर वाटचाल करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत विश्वगुरू म्हणून उदयास येत आहे, असेही ते म्हणाले.
अमृत महोत्सवाचा एक भाग म्हणून तालुक्यातील एसएसएलसी परीक्षेत सर्वाधिक गुण मिळविणार्या तीन विद्यार्थ्यांना लॅपटॉप व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. त्यानुसार महाविद्यालयातील विविध विषयात प्रावीण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तालुका प्रशासनाच्यावतीने माजी सैनिक, सामाजिक कार्यकर्ते, अंगणवाडी-आशा सेविका, पत्रकार यांचा सत्कार करण्यात आला. कागवाड तहसीलदार राजेश बुर्ली यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून बेळगाव जिल्हा पंचायत उपसचिव बसवराज हेग्गनकायी यांचेही भाषण झाले.
ध्वजारोहणापूर्वी सकाळी पोलीस विभाग, एनसीसी कॅडेट आणि एनएसएस स्वयंसेवक, स्काऊट आणि गाईड्स युनिट, रोवर आणि रेंजर शाळेच्या विद्यार्थ्यांनी गावातून प्रभातफेरी काढली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर मनोरंजनात्मक कार्यक्रम सादर केले. कागवाड तहसीलदार राजेश बुर्ली, बीईओ एम. आर. मुंजे, सीडीपीओ संजीवकुमार सदलगे, पीएसआय बी. एम. रबकवी, एमओ वीराणगौडा हेगनगौडा, वैद्यकीय अधिकारी पुष्पलता सन्नादकल, प्राचार्य वाय. एस. तुगशेट्टी, उपतहसीलदार अण्णासाबा कोरे, सर्व विभागाचे अधिकारी, सर्व शाळा-महाविद्यालयांचे शिक्षक, विद्यार्थी, आशा- अंगणवाडी सेविका, माजी सैनिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रा. जे. के. पाटील यांनी कार्यक्रमाचे निवेदन केले.
Belgaum Varta Belgaum Varta