
बेळगाव : 1947 मधील देशाच्या फाळणीवेळी तेथील महिलांचे हाल पाहून राष्ट्र सेविका समितीच्या प्रथम संचालिका वंदनीय लक्ष्मीताई केळकर यांनी महिलांना मदतीचा हात दिला. राष्ट्र सेविका समिती सातत्याने समाजकार्यात झोकून देऊन कार्य करीत आहे, असे मनोगत समितीच्या अ. भा. सहकार्यवाहिका अलकाताई इनामदार यांनी व्यक्त केले.
बी. के. मॉडेल शाळेत दि. 14 रोजी समिती आयोजित गीतगंगा व रक्षाबंधन कार्यक्रमात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी मराठा मंडळाच्या अध्यक्षा राजश्री हलगेकर उपस्थित होत्या. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्ताने 75 देशभक्तिपर गीतगायनाचा ‘गीतगंगा’ कार्यक्रम सकाळी 9 पासून सलग सहा तास सुरू होता. यात समितीच्या कार्यकर्त्या, महिला मंडळ, भजनी मंडळांनी भाग घेतला.
खानापूर, रामदुर्ग, लोंढा येथील कार्यकर्त्याही सहभागी होत्या. वय 7 ते 70 वर्षांपासूनच्या मुली आणि महिला मिळून एकूण 650 महिला यात सामील होत्या.
यावेळी राजश्री हलगेकर म्हणाल्या, की समितीचे कार्य कौतुकास्पद आहे. सर्वांनी मिळून भारत बलशाली करूया. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंजली गरग यांनी केले. पंकजा भट यांनी आभार प्रदर्शन केले. मानसी गोखले यांनी गायिलेल्या वंदेमातरम गीताने कार्यक्रमाची सांगता झाली. लक्ष्मी मिरजी, वाणी रमेश, प्रज्ञा कामत आदी कार्यकर्त्या उपस्थित होत्या.
Belgaum Varta Belgaum Varta