बेळगाव : आंतरराष्ट्रीय श्री कृष्ण भावनामृत संघ (इस्कॉन)च्या वतीने गेल्या आठवडाभर चाललेल्या श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सवाची शनिवारी दुपारी सांगता झाली. काल मध्यरात्री श्रीकृष्ण जन्मोत्सव संपन्न झाल्यानंतर इस्कॉनचे संस्थापक श्रील प्रभुपाद यांचा अविर्भाव दिन आज शनिवारी मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. प्रभुपाद यांच्यासाठी आज श्री श्री राधा गोकुलानंद मंदिरात विशेष पूजेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी बोलताना इस्कॉन बेळगावचे अध्यक्ष परमपूज्य भक्तीरसामृत स्वामी महाराज म्हणाले की,” दुनिया मध्ये अनेक प्रकारचे उत्सव साजरे केले जातात असे उत्सव माणसाला आनंद देतात पण श्रील प्रभुपादानी इस्कॉन ची स्थापना करून आणि जन्माष्टमी, राम नवमी,जगन्नाथ रथयात्रा यासारख्या अनेक उत्सवांचे आयोजन करून तसेच अनेक ग्रंथांचे विपुल लिखाण करून ज्ञानाचे भांडार सर्वांसाठी खुले केले आहे. अशा अनमोल रत्नांचे भांडार त्यांनी जनतेला दिले आहे त्यांच्या या ज्ञानाचा उपयोग करून घेऊन जगभरातील लाखो लाखो लोकांनी आपले जीवन समृद्ध केले आहे. त्या प्रभदांच्या चरणावर नतमस्तक होऊन आमचा श्वास असेपर्यंत आम्ही त्यांच्या कार्यात राहू” असे ते म्हणाले .
त्यानंतर 15 हून अधिक भक्तांनी श्री प्रभुपाद यांच्या बद्दल गुणगौरवपर आपले विचार व्यक्त केले. पुष्पांजली, आरती आणि कीर्तन झाल्यानंतर महाप्रसाद झाला. आजही अनेक भक्तांनी उपस्थित राहून या सर्व कार्यक्रमांचा लाभ घेतला. या संपूर्ण जन्माष्टमी महोत्सवात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी झाल्याबद्दल इस्कॉनच्या वतीने जनतेचे आभार मानण्यात आले आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta