बेळगाव : अथर्व फाउंडेशन या संस्थेच्या वतीने गेल्या वर्षी गणेश चतुर्थीला सोमवार पेठ टिळकवाडी येथे सुरू करण्यात आलेल्या लॅबोरेटरीला मिळालेला प्रतिसाद आणि शहरी विभागातील नागरिकांची मागणी लक्षात घेऊन अथर्वच्या वतीने कडोलकर गल्ली बेळगाव येथे रविवारी आणखी एक रक्त-लघवी कलेक्शन केन्द्राचा प्रारंभ करण्यात आला. उत्तर विभागाचे आमदार अनिल बेनके व डॉ. उदय साठे यांनी फित सोडून या केन्द्राचे उद्घाटन केले.
याप्रसंगी बोलताना आमदार बेनके म्हणाले की, “आजकाल शहरात कोणीही एक इंच जागा सोडत नाही अशा परिस्थितीत डॉक्टर उदय साठे यांनी या चांगल्या कामासाठी आपली जागा मोफत दिली आहे हे आदर्शवत काम आहे. अथर्वने ‘ना नफा ना तोटा’ या तत्त्वावर सुरू केलेल्या या केन्द्राचा नागरिकांनी लाभ करून घ्यावा “असे आवाहन त्यांनी केले
प्रारंभी उपस्थितांचे स्वागत नितीन कपिलेश्वरी यांनी केल्यावर आमदारांचा सत्कार लॅब प्रकल्पाचे मुख्य डॉ. श्रीकांत विरगे यांनी केला. तर डॉ. उदय साठे यांचा सत्कार आमदार अनिल बेनके यांच्या हस्ते करण्यात आला.
अथर्वचे अध्यक्ष विजय पाटील यांनी लॅबच्या कार्याचा आढावा घेऊन गेल्या वर्षभरात नागरिकांनी दिलेल्या सहकार्याबद्दल धन्यवाद व्यक्त केले. प्रास्ताविक आणि आभार प्रदर्शन अथर्वचे चिटणीस संतोष चांडक यांनी केले याप्रसंगी डॉक्टर समीर बागेवाडी, हरीकिशन ठक्कर, शिल्पा केकरे, अनंत लाड, आनंद नाईक, सागर उंदरे, वैभव मुचंडी, अर्जुन बाडीवाले, सुशांत उंदरे, यल्लाप्पा बाडीवाले आणि विजय पोरवाल आदी मान्यवर उपस्थित होते. सोमवारपासून ही लॅब रक्त व लघवी तपासणीसाठी रोज सकाळी आठ ते सायंकाळी चार या वेळात सुरू राहणार असल्याचे अथर्व करून कळविण्यात आले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta