बेळगाव : बेळगाव येथील सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने श्रावण मासानिमित्त सोमवार दिनांक 22 ऑगस्टपासून आयोजित केलेल्या संगीत भजन स्पर्धेला उद्या प्रारंभ होणार आहे. या स्पर्धेचे उद्घाटन संत साहित्याचे अभ्यासक ह.भ.प. एस. बी. ओऊळकर यांच्या हस्ते दुपारी 3 वाजता मराठा मंदिर खानापूर रोड रेल्वे ओव्हर ब्रिज येथे होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाचनालयाचे अध्यक्ष नेताजी जाधव असणार आहेत.
ही स्पर्धा बेळगाव शहर, तालुका आणि खानापूर व चंदगड तालुका या विभागासाठी मर्यादित आहे व ही स्पर्धा पुरुष व महिला अशा दोन गटात होणार आहेत. पुरुष गटात 17 व महिला गटात 16 अशा एकूण 33 भजनी मंडळाने उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला आहे.
पहिल्या दिवशी उद्घाटनाच्या कार्यक्रमानंतर संत मुक्ताई महिला भजनी मंडळ (भारत नगर शहापूर बेळगाव), श्री हनुमान भजनी मंडळ (ता. खानापूर), जय हनुमान कलाप्रेमी भजनी मंडळ (तासगाव तालुका चंदगड), सद्गुरु भजनी मंडळ (भाग्यनगर बेळगाव), जिव्हेश्वर महिला भजनी मंडळ (बाजार गल्ली, वडगाव), ही मंडळे संगीत भजन सादर करणार आहेत. प्रवेश सर्वांना खुला असून या स्पर्धेचा सर्वांनी घ्यावा असे आवाहन वाचनालयातर्फे करण्यात आले आहे.
हभप एस. बी. ओऊळकर यांचा अल्पपरिचय

हभप एस. बी. ओऊळकर हे चंदगड तालुक्यातील तुर्केवाडी येथील असून ते महात्मा फुले महाविद्यालय कार्वे येथे प्रदीर्घकाळ अध्यापनाचे कार्य करून निवृत्त झाले आहेत.
संत साहित्याचे अभ्यासक म्हणून त्यांची ओळख आहे. सामाजिक सुधारण्याची तळमळ असल्याने यातून भजन प्रवचन कीर्तने याकडे त्यांचा ओढा निर्माण झाला आहे.
अंधश्रद्धा निर्मूलन व सुसंस्कार यांचा प्रचार व प्रसार तसेच वृत्तपत्रांमधून प्रबोधनपर लेखन केले आहे. आत्मत्त्वाकडे जाण्याचा मार्ग, भगवद्गीता काय सांगते दीपकलिका ताटीचे अभंग, पंढरीच्या वारीचा हेतू त्यांची ही पुस्तके प्रकाशित झाली असून समाजप्रबोधनासाठी त्यांनी विनामूल्य वितरित केली आहेत. त्यांना विविध पुरस्कार प्राप्त झाले असून महाराष्ट्र शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार, राष्ट्रीय सन्मान पुरस्कार, साहित्य पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत ते ग्रामीण मराठी साहित्य समेलनाचे अध्यक्ष पद भूषवले आहे. संत साहित्य विषयावरील चर्चासत्रात विविध ठिकाणी भजन कीर्तन प्रवचनाचे कार्य करीत आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta