आ. श्रीमंत पाटील : पांडेगाव येथे जलजीवन योजनेचे उद्घाटन
अथणी (प्रतिनिधी) : सीमाभागातील रस्त्यांसाठी 170 कोटी रुपये अनुदान मिळाले आहे. सर्वच रस्त्यांचे डांबरीकरण पूर्णत्वाकडे असून तालुक्याला जोडणारे सर्व ग्रामीण रस्ते गुळगुळीत करण्याचा आपला ध्यास आहे असे मनोगत माजी मंत्री व कागवाडचे आमदार श्रीमंत पाटील यांनी व्यक्त केले.
पांडेगाव (ता. अथणी) येथे जलजीवन योजनेचे शुभारंभ आमदारांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात बोलत होते. शिरूर ग्रामपंचायत अध्यक्ष बाळू हजारे अध्यक्षस्थानी होते. भाजप नेते महादेव कोरे, ग्रामपंचायत सदस्य संदीप जाधव, रमेश कुरुंदवाडे, डी. के. पवार व्यासपीठावर होते.
आमदार पाटील म्हणाले, मी निवडणुकीत दिलेल्या आश्वासनानुसार कामे पूर्ण करत आहे. मतदारसंघात रस्ते, पाणी योजना शाळा इमारत बांधकामावर अधिक भर दिला आहे. संपूर्ण कागवाड मतदारसंघात विकासाची गंगा वाहत आहे. त्याचबरोबर खिळेगाव-बसवेश्वर पाणी योजना डिसेंबर अखेर पूर्ण करून दुष्काळी भागातील शेतकऱ्याच्या जमिनीला पाणी देण्याची व्यवस्था करणार आहे. मी बोलणारा तसा चालणारा व्यक्ती आहे. माझा सध्या तरी एकच ध्यास असून दुष्काळी भाग सुजलाम सुफलाम बनला पाहिजे, हेच आपले स्वप्न आहे.
यावेळी ता. पं. चे माजी अध्यक्ष राम सोडी, अशोक गडदे शिवाजी चौगुले, अमित कांबळे, चिदानंद कागली, भीमराव पुजारी, तिप्पान्ना बजंत्री, रवींद्र मुरगाळी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.