अंकली : संपूर्ण आशिया खंडात पूर्व प्राथमिक शिक्षणापासून पदवी व पदव्युत्तर शिक्षणापर्यंत ज्ञानदानाची गंगा उपलब्ध करून देणार्या बेळगाव येथील केएलई शिक्षण संस्थेचे कार्य अत्यंत मोलाचे आहे त्याचबरोबर उत्तर कर्नाटकाच्या शैक्षणिक विकासाबरोबरच सर्वांगीण विकासासाठी केएलई शिक्षण संस्थेची धुरा सांभाळणारे संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे यांचे कार्य अजरामर आहे, असे प्रतिपादन राज्याचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी केले.
बेंगलोर येथे वीरशैव लिंगायत संघटना समितीच्यावतीने आयोजित केलेल्या श्री वीरभद्रेश्वर जयंती उत्सवानिमित्त केएलई शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे यांना या वर्षांचा श्री वीरभद्रेश्वर पुरस्कार प्रदान समारंभात ते बोलत होते. या समारंभाचे दिव्य सानिध्य पंचपीठांपैकी उज्जैनी पिठाचे परमपूज्य सिद्धलिंगेश्वर राज देशीकेंद्र शिवाचार्य महास्वामीजी यांचे होते.
समारंभाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारत वीरशैव महासभेचे केंद्रीय अध्यक्ष माजी मंत्री विद्यमान आमदार शामनूर शिवशंकरप्पा हे होते. संपूर्ण आशिया खंडात शैक्षणिक क्रांती घडविणार्या व सप्तर्षीच्या त्यागातून उभारलेल्या केएलई शिक्षणसंस्थेने सर्वसामान्य जनतेच्या मुलांच्या शिक्षणासाठी केलेले कार्य अजरामर आहे. कोणत्याही शासनाला जमणार नाही असे कार्य केएलई शिक्षण संस्थेने केले आहे. आज प्रत्येक क्षेत्रात केएलई शिक्षण संस्था म्हणजे ज्ञानदानाची गंगाच आहे. या ज्ञानदानाचा गंगेचे भगीरथ असणारे डॉ. प्रभाकर कोरे यांचे कार्य अत्यंत मोलाचे आहे. उत्तर कर्नाटकाच्या विकासासाठी डॉ. प्रभाकर कोरे यांनी केलेले परिश्रम ही लाख मोलाचे आहे. सर्वच समाजाच्या दृष्टिकोनातून त्यांनी करणारे कार्य आजच्या युवकांना प्रेरणादायी आहे, असे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा म्हणाले.
या वर्षाचा वीरशैव महासभेच्या श्री वीरभद्रेश्वर पुरस्कार स्वीकारून बोलताना डॉ. प्रभाकर कोरे म्हणाले की, केएलई शिक्षण संस्थेच्या उभारणीसाठी सप्तर्षींनी केलेले त्याग आजही मला बालपणापासून अत्यंत प्रेरणादायी आहे. आज समाजातील प्रत्येक विद्यार्थ्यांला गुणवत्तेचे व अत्यंत लाखमोलाचे शिक्षण मिळावे म्हणून केएलई ही शिक्षण संस्थेने शहरापासून ग्रामीण भागापर्यंत संस्थेच्या शाखा उभारून शैक्षणिक क्रांती घडवली आहे. शैक्षणिक क्रांतीला अनुसरूनच आज मिळालेला हा वीरभद्रेश्वर पुरस्कार माझ्या जीवनातील एक अविस्मरणीय क्षण असल्याचे ते म्हणाले. सदर पुरस्कारामुळे मला पुन्हा शैक्षणिक क्षेत्रात कार्य करण्याची ऊर्जा मिळाले असल्याचेही ते म्हणाले.
समारंभाच्या अध्यक्षस्थानी बोलताना अखिल भारतीय वीरशैव महासभेचे अध्यक्ष शामनूर शिवशंकरप्पा म्हणाले की, केएलई शिक्षण संस्थेचा विस्तार केलेले डॉ. प्रभाकर कोरे यांना देण्यात येणारा हा पुरस्कार म्हणजे त्यांच्या जीवनाला पुन्हा ऊर्जा देणारे असल्याचे ते म्हणाले. प्रभाकर कोरे यांच्या शैक्षणिक कार्याला आपण सदैव सहकार्य राहील असेही त्यांनी सांगितले.
यावेळी कर्नाटक विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. सी. सोमशेखर बोलताना म्हणाले की, अत्यंत पौराणिक व इतिहासात प्रसिध्द असलेल्या वीरभद्राच्या स्मरणिकेसाठी शासनाने प्रत्येक वर्षी शासकीय स्तरावर आयोजित केलेल्या वीरभद्रेश्वर जयंती कार्यक्रमाला महत्त्व प्राप्त झाले आहे असे ते म्हणाले.
यावेळी उज्जैन पिठाचे जगद्गुरू महास्वामीजींचे आशीर्वाद वचन झाले. या समारंभास माजी मंत्री एम. बी. पाटील, एन. ए. हॅरिस, महंमद नलपाडा, बेंगळूरचे माजी महापौर गंगाम्बिक मल्लिकार्जुन, बी. एस. पुट्टराजू, जिल्हा पंचायत माजी अध्यक्ष मरी स्वामी, केआरडीसीएलचे अध्यक्ष जे. व्ही. बसवराजू, डी. एस. वॅक्स संस्थापक दयानंद, कर्नाटक चलनचित्र निर्माता संघाचे अध्यक्ष उमेश बनकर, महांतेश पाटील, प्रशांत कल्लूर, प्रदीप कंकणवाडी यांच्यासह अखिल भारतीय वीरशैव महासभेच्या कर्नाटक शाखेचे पदाधिकारी व अनेक मान्यवर नागरिक पदाधिकारी उपस्थित होते.
———————————————————————————————–
वीरभद्रेश्वर पुरस्काराची रक्कम वीरशैव महासभेच्या बेळगाव येथील महिला वसतिगृहाच्या इमारतीसाठी दान
केएलई शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे यांना वीरशैव महासभेच्या यावर्षीच्या वीरभद्र पुरस्काराची रक्कम एक लाख रुपये देण्यात आले असून सदर रक्कमही डॉ. प्रभाकर कोरे यांनी बेळगाव येथे अखिल भारतीय वीरशैव महासभेच्या वतीने गरीब महिला विद्यार्थ्यांसाठी बांधण्यात येणार्या वसतिगृहांच्या इमारतीसाठी देणगी जाहीर केली. डॉ. प्रभाकर कोरे यांनी देणगी जाहीर करताच अखिल भारत वीरशैव महासभेचे अध्यक्ष शामनूर शिवशंकरप्पा यांनी बेळगाव येथील अखिल भारतीय वीरशैव महासभेच्या महिला वसतिगृहासाठी आपण सुसज्जित अशा अकरा लाख रुपये खर्चून दोन खोली बांधून देण्याचे आवाहन त्यांनी जाहीर केले.
Belgaum Varta Belgaum Varta