बेळगाव : बाल्कनीतून फुले काढताना तोल जाऊन पडल्याने एका मुलीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना वीरभद्र नगरात घडली. या हिंदू मुलीच्या अंत्यसंस्कारात मुस्लीम नेत्यांनी पुढाकार घेऊन माणुसकीचे दर्शन घडविले आहे. वीरभद्र नगर येथे राहणारी विद्याश्री हेगडे असे मृत मुलीचे नाव आहे. मूळची उडुपी जिल्ह्यातील असलेल्या मुलीच्या वडील कुटुंबासह अनेक वर्षांपूर्वी बेळगावात येऊन स्थायिक झाले आहेत. गुरुवारी ही मुलगी इमारतीसमोरील फूल काढण्यासाठी गेली असता तोल जाऊन पहिल्या मजल्यावरून जमिनीवर पडली. यावेळी जखमी मुलीला स्थानिक मुस्लिम नेत्यांनी खासगी रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयातील उपचारांचा खर्चही त्यांनीच दिला. परंतु उपचारांचा उपयोग न होता त्या मुलीचे निधन झाले. त्यानंतर मुस्लिम नेत्यांनी स्वत: पुढे येऊन अंत्यसंस्काराची तयारी केली. सदाशिव नगर येथील लिंगायत स्मशानभूमीत लिंगायत परंपरेनुसार त्या मुलीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. मुस्लिम नेत्यांच्या या मानवतावादी कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
अंत्यसंस्काराला नगरसेवक बाबाजान मतवाले, रियाज किल्लेदार, इम्रान पारखान, शहीद पठाण, सलमान मंगलकट्टी, राजू शेख तसेच तट्टे इडली हॉटेलचे मालक शांतकुमार आदी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta