Monday , December 15 2025
Breaking News

विश्वकर्मा पांचाळ मनुमय संस्थेचा अमृत महोत्सव साजरा

Spread the love

दोन दिवस भर गच्च कार्यक्रम

बेळगाव : “कन्याकुमारी पासून बद्रीनारायण पर्यंत आणि पार काश्मीर पर्यंत जी अनेक मंदिरे, शिल्पकला, मुर्त्या निर्माण केल्या आहेत त्या सर्व श्री विश्वकर्मा आणि त्यांच्या वारसदारांनी. प्राचीन शिल्पी जकणाचारीपासून आता आत्तापर्यंतच्या आधुनिक शिल्पकारांपर्यंत सर्व जगाची सेवा करणारा समुदाय म्हणजे विश्वकर्मा समुदाय होय” असे विचार विश्वकर्मा जगद्गुरु पीठ महासंस्थान मठ अरेमदन हळळी, तालुका हसनचे प्रमुख स्वामी श्री श्री श्री
शिवसूज्ञान तीर्थ यांनी बोलताना व्यक्त केले. येथील श्री विश्वकर्मा पांचाळ मनुमय संस्थेला 75 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल त्या संस्थेचा अमृत महोत्सव भव्य प्रमाणात साजरा करण्यात येत असून त्यानिमित्त 16 व 17 सप्टेंबर रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमास परमपूज्य श्री श्री श्री शिवसूज्ञान तीर्थ स्वामीजी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते तर व्यासपीठावर खासदार श्रीमती मंगला अंगडी, भाजप नेते शंकरगौडा पाटील, कर्नाटक राज्य विश्वकर्मा समाजाचे अध्यक्ष बाबू पत्तार, सार्वजनिक वाचनालय आणि पायोनियर बँकेचे संचालक अनंत लाड, बेळगाव ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष विजय कदम, विश्वकर्मा संस्थेचे अध्यक्ष भारत रामचंद्र शिरोळकर व बिल्डर एन. एस. शंकराचार्य आदी उपस्थित होते.
दीप प्रज्वलनानंतर संस्थेचे अध्यक्ष भरत शिरोळकर यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला आणि 75 वर्षात आम्ही 75 संस्था एकत्र आलो आहोत आणि लवकरच एक शैक्षणिक संस्था निर्माण करणार आहोत, असे सांगितले. त्यांच्याच हस्ते व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचा शाल, पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
शिवसुज्ञानतीर्थ स्वामीजी आपल्या भाषणात पुढे म्हणाले की, “जगाची निर्मिती करणाऱ्या विश्वकर्माचे आम्ही अनुयायी आहोत. आम्ही सर्वजण एकच आहोत ही भावना दृढ करण्याची गरज असून विदेशातील लोक जेव्हा भारतात येतात तेव्हा ती येथील अनेक मंदिरांची, शिल्पांची पाहणी करतात. ह्या शिल्पांची निर्मिती कशी केली आहे त्याचा अभ्यास करतात. त्या शिल्पांमध्ये दडलेल्या भावनांचा अभ्यास करतात. आपणही बेळगावात 75 वर्षांपूर्वी सुरू केलेल्या या विश्वकर्मा भवनात दरवर्षी सामूहिक उपनयन करा, त्यातून समाज एकत्र येईल. येथे भाषा, वर्ण महत्त्वाचा नाही असेही ते म्हणाले. यावेळी बोलताना खासदार अंगडी यांनी या उपक्रमाबद्दल समाजाचे कौतुक केले आणि समाजाच्या ज्या अडीअडचणी आहेत त्या सोडविण्यासाठी सरकार दरबारी मी प्रयत्न करीन अशी ग्वाही दिली. यावेळी बोलताना बाबु पत्तार म्हणाले की, “30 ते 35 लाख लोकसंख्या असलेला पण एकी नसल्याने एकमेकापासून दूर राहिलेला विश्वकर्मा समाज हा बुद्धिवंत आहे. कोणत्याही प्रकारचे काम करायची त्याची तयारी आहे. असे असताना आम्ही राजकीय महत्त्वकांक्षा नसल्याने सरकारकडून आलेल्या सुविधांचा उपयोग करून घेतला जात नाही. त्यामुळेच समाज सुविधांपासून वंचित राहिला आहे. लवकरच बेंगलोर समाजातील एक लाख लोकांचा मेळावा भरविण्याची आमची योजना आहे” असे सांगून त्यांनी संस्थेसाठी कार्य केलेल्या सर्वांचे कौतुक केले.
यावेळी बोलताना शंकरगौडा पाटील म्हणाले की, “विश्वकर्मा समाज देशात विविध ठिकाणी पण वेगवेगळ्या नावाने पसरलेला आहे. मात्र सर्वांचे काम एकच आहे विश्वकर्मा समाज म्हणजे विश्वाची निर्मिती करणारा समाज, असे असूनही या समाजातील काही लोक कनिष्ठ दर्जाचे जीवन का जगतात याचा विचार होण्याची गरज आहे. त्यासाठी तुमची विचारधारा बदलण्याची गरज आहे. तुम्ही समाजासाठी जगा, चिंतन सभा घ्या, घरोघरी जाऊन संपर्क करा, गोरगरिबांना मदत करा, समाजातील श्रीमंतांचा उपयोग समाजवाढीसाठी करा. तुम्ही एकत्र आल्याशिवाय तुमच्या समस्या सुटणार नाहीत. सरकारकडून असलेल्या विविध सुविधांचा लाभ घेण्यासाठी लोकप्रतिनिधींचा उपयोग करून घ्या” असा सल्लाही श्री. शंकरगौडा पाटील यांनी दिला.
प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित असलेल्या अनंत लाड यांनी संस्थेच्या कार्याचे कौतुक केले. “सुमारे 58 वर्षांपूर्वी समाजातील 24 धुरिणानि दुरदृष्टिकोनातून दोनशे रुपयाची प्रत्येकी देणगी देऊन ही जागा खरेदी केली. त्या सर्वांची आठवण करण्याचा हा दिवस,” असे ते म्हणाले.
“14 विश्व निर्माण करणाऱ्या प्रभु विश्वकर्मा यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकून, त्यांना अभिवादन करून ते म्हणाले की “यावर्षी देशाच्या स्वातंत्र्यालाही 75 वर्षे पूर्ण झाली असून आपण आजादी का अमृत महोत्सव साजरा करीत आहोत. त्याचप्रमाणे विश्वकर्मा संस्थेला ही 75 वर्षे झाल्याने हा एक अमृत योगच आहे. विश्वकर्मा हा जगाचा निर्माता आणि देवतांचे शिल्पकार मानला जातो. त्यांनीच श्रीकृष्णांच्या मार्गदर्शना खाली द्वारका वसवली, रावणासाठी लंका बांधली, चार युगात अनेक शहरे व इमारती बांधल्या. त्यामध्ये सत्य युगात स्वर्गीय जग, त्रैतायुगात लंका, द्वापरयुगात द्वारका आणि कलियुगाच्या प्रारंभापूर्वी 50 वर्ष अगोदर इंद्रप्रस्थनगरी तयार केली. अशा या विश्वकर्माचे वारस असलेल्या समाजात एकी नसल्यामुळे हा समाज विखुरलेला आहे. देशाच्या विविध भागात एवढेच नव्हे तर जगभरात सर्वत्र वसलेल्या या कष्टकरी समाजाने स्वतःच्या विकासासाठी एकत्र येण्याची गरज आहे, असे सांगून समाजात कार्य करीत असलेल्या कार्यकर्त्यांचा गौरवपूर्ण उल्लेख केला.
याप्रसंगी विजय रामा कदम, महांतेश यांचीही भाषणे झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्री. किसन ठोकणेकर यांनी केले. कार्यक्रमास बेळगाव जिल्ह्याच्या विविध भागातून विश्वकर्मा समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते. त्या सर्वांच्या हस्ते स्वामीजींचा सन्मान करण्यात आला.
दरम्यान सकाळी झालेल्या कार्यक्रमात कार्यकर्त्यांच्या हस्ते ध्वजवंदन झाल्यावर 1962 साली संस्थेला जागा खरेदी करण्यासाठी देणगी दिलेल्या 24 देणगीदारांच्या फोटोचे अनावरण व त्यांच्या कुटुंबीयांचा सत्कार करण्यात आला. यावेळी श्री. प्रकाश शिरोळकर यांनी दीपप्रज्वलन करून संस्थेस मूर्ती साठी एक किलो चांदी देण्याचे जाहीर केले. दुपारी प्रभू विश्वकर्मा मूर्तीचे अभिषेक व पूजन स्वामीजींच्या हस्ते झाल्यावर त्यांची पाद्यपूजा करण्यात आली.
दुपारी कार्यक्रमानंतर महाप्रसाद झाला. त्यानंतर बेळगाव आणि परिसरातील सर्व विश्वकर्मा मंडळांचा सत्कार आणि सायंकाळी हुदलीकर यांच्या भक्ती गीते गायनाचा कार्यक्रम झाला. रात्री नावगे येथील भजनी मंडळाच्या वतीने भजन, कीर्तन व प्रवचन कार्यक्रम झाले.

शनिवारचे कार्यक्रम

शनिवारी उत्तर भारतीय विश्वकर्मा समाजाच्या वतीने विश्वकर्मा प्रकट दिनाप्रित्यर्थ मूर्ती अभिषेक, होम हवन, पूजा आयोजित करण्यात आली असून त्यानंतर समाज बांधवांची शहरांमध्ये प्रभाग फेरी निघणार आहे. दुपारी बारा वाजता विश्वकर्मा मंदिरात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

पतीकडून पत्नी आणि कुटुंबियांचा पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न

Spread the love  अथणी : पतीच्या घरी झालेल्या भांडणामुळे कंटाळून आपल्या गावी गेलेल्या पत्नी आणि …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *