बेळगाव : उचगाव येथील मळेकरणी हायस्कूलमधून मुख्याध्यापक म्हणून निवृत्त झालेले आणि सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक क्षेत्रात गेली 50 वर्षे कार्यरत राहिल्याने त्यांच्या कार्याची दखल घेऊन “नॅशनल रुरल डेव्हलपमेंट फाउंडेशन व हेल्थ अँड नेचर डेव्हलपमेंट सोसायटी आणि अंतरराज्य पुरस्कार वितरण समिती” चिकोडी यांच्या विद्यमाने कर्नाटक, महाराष्ट्र व गोवा या तीन राज्यातून आंतरराज्य गौरव पुरस्काराने अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत एन. ओ. चौगुले यांचा म्हैसूरी फेटा, म्हैसूरी हार, सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. हा कार्यक्रम बेळगाव येथील धर्मनाथ भवन, अशोक नगर येथे शनिवारी दुपारी पार पडला.
सामाजिक व शैक्षणिक, शासकीय व निमशासकीय क्षेत्रात उल्लेखनीय व अतुलनीय, निस्वार्थी व भरीवपणे कार्य करून शाश्वत सेवा केलेबद्दल वैशिष्ट्यपूर्ण गुणवत्तेच्या सन्मानार्थ विधायक व कौतुकास्पद कार्याची दखल घेऊन हा आंतरराज्य पुरस्कार एन. ओ. चौगुले यांना बहाल करण्यात आला. यावेळी गोवा सरकारचे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर तसेच केंद्रीय मंत्री श्रीमती रत्नमाला सावनूर, माजी खासदार बॅरिस्टर अमरसिंह पाटील, हिंगोलीचे आदर्श आमदार निलेश लंके, जिल्हा कमांडंट होमगार्ड डिपार्टमेंटचे अरविंद घटी, कोल्हापूरचे माजी महापौर राजू शिंगाडे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाला गोवा, कर्नाटक आणि महाराष्ट्र मधून जवळपास दोन हजार नागरिकांनी उपस्थिती लावली होती. या पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये सव्वाशे अतुलनीय व उल्लेखनीय कार्य केलेल्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
एन. ओ. चौगुले सर यांना यापूर्वी सार्वजनिक शिक्षण खात्याचा जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार तसेच सार्वजनिक वाचनालयाचा उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार, जायंट्स ग्रुप ऑफ बेळगावचा आदर्श शिक्षक पुरस्कार, रोटरी क्लबच्या वतीने उत्कृष्ट कार्यकर्ता म्हणून पुरस्कार देऊन गौरविण्यात आलेले आहे. तसेच सांगाती विशेष सन्मान पुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात आलेले आहे. या त्यांच्या अतुलनीय व मिळालेल्या पुरस्काराबद्दल सर्व थरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.गोवा सरकारचे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या हस्ते एन. ओ. चौगुले यांना आंतरराज्य पुरस्कार देऊन गौरविताना शेजारी हिंगोलीचे आदर्श आमदार निलेश लोकेश व इतर मान्यवर मंडळी.
Belgaum Varta Belgaum Varta