मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत निर्णय
बेळगाव : अटक झाली तरी चालेल पण 1 नोव्हेंबर काळ्या दिनी विराट मूक मोर्चा आणि सायकल फेरी काढणारच असा निर्धार मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत घेण्यात आला.
मराठा मंदिर येथे कार्याध्यक्ष मनोहर किणेकर यांच्या अध्यक्षतेखाली मध्यवर्ती म. ए. समितीची बैठक झाली. त्यावेळी बोलताना किणेकर म्हणाले की, जोपर्यंत सीमाप्रश्नावर निकाल लागत नाही तोपर्यंत या भागात परिस्थिती जैसे थे ठेवा असा कोर्टाचा निर्णय आहे. तसेच हा भाग वादग्रस्त आहे हे केंद्र सरकारने मान्य केले आहे तरी देखील कर्नाटक सरकारकडून आमच्यावर जाणीवपूर्वक कन्नड सक्ती केली जात आहे. कर्नाटक सरकारने पुन्हा कन्नड सक्ती कायदा केला आहे तो कायदा सीमाभागात लागू केला जाऊ नये अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू व तीव्र आंदोलन करू असा इशारा यावेळी देण्यात आला. सीमाभाग महाराष्ट्रात समाविष्ठ करावा या मागणीसाठी सीमाभागातील मराठी जनता कायद्याची लढाई लढत आहे. 1 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या सायकल फेरीत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
सीमाप्रश्नी 23 नोव्हेंबर रोजी महत्वपूर्ण सुनावणी होणार आहे. कर्नाटक सरकारने सीमाप्रश्नाच्या दाव्यावर थेट आव्हान केले आहे. हा दावा न्यायालयात चालू शकत नाही असा त्यांचा दावा आहे त्यामळे 1 नोव्हेंबरला पाळला जाणारा काळा दिन गांभीर्याने पाळणे महत्वाचे आहे यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करणे गरजेचे आहे, असे ऍड. राजाभाऊ पाटील यांनी सांगितले.
यावेळी मालोजी अष्टेकर, प्रकाश मरगाळे, रणजीत चव्हाण-पाटील, संभाजी देसाई, गोपाळ देसाई आदींनी मनोगत व्यक्त केले. काळ्यादिनाच्या जागृतीसाठी घटक समित्यांनी बैठका घेऊन गावोगावी जागृती करण्याचे आवाहन करण्यात आले.
एस. एल. चौगुले, अॅड. एम. जी. पाटील, विकास कलघटगी, निरंजन सरदेसाई, बी. डी. मोहनगेकर, नानू पाटील, रावजी पाटील, बी. एस. पाटील आदी उपस्थित होते.
महाराष्ट्रातील सर्वपक्षीय नेत्यांना पत्र
1 नोव्हेंबर काळ्यादिनाच्या फेरीत सहभागी होण्यासाठी महाराष्ट्रातील सर्वपक्षीय नेत्यांना पत्र पाठवण्यात येणार आहे. मिरवणुकीनंतर मराठा मंदिर येथे जाहीर सभा होणार आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
Belgaum Varta Belgaum Varta