बेळगाव (प्रतिनिधी) : शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुणे शहरात नोकरी, व्यवसाय – उद्योगानिमित्त स्थायिक
झालेल्या बेळगावकरांना कौशल्याने एकत्र आणून त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी श्री.नारायण महादेव रामजी यांनी गेल्या 32 वर्षांपूर्वी
बेळगाव मित्र मंडळ ट्रस्ट,पुणे ची स्थापना केली. या ट्रस्टच्या माध्यमातून श्री. नारायण रामजी पुणे स्थित बेळगावकरांसाठी पुणे शहरात विविध सामाजिक उपक्रम राबवत आहेत. खरचं एखाद्या ट्रस्टची जबाबदारी सांभाळत असताना फार मोठे कष्ट घ्यावे लागतात. मात्र सहकाऱ्यांच्या मदतीने अध्यक्ष श्री. नारायण रामजी यांनी हे शिवधनुष्य अगदी लिलया पेलले आहे, असे उद्गार श्री. नेताजी जाधव यांनी काढले. बेळगाव मित्र मंडळ ट्रस्ट पुणे तर्फे शहापूर कोरे गल्लीतील गंगापुरी मठ येथे आयोजित मराठा समाज वधू – वर सूचक मेळाव्यात ते बोलत होते. गेल्या 42 वर्षांपूर्वी पुण्यात स्थायिक होऊनही रामजी यांची बेळगावशी नाळ अजूनही तुटलेली नाही. म्हणूनच सीमाप्रश्नाच्या जागृतीसाठी पुणे येथे प्रातिनिधीक मेळावा घेऊन सीमाप्रश्न सोडविण्यासाठी योगदान देण्याची ग्वाही त्यांनी दिली होती असेही ते म्हणाले.बेळगावातील मुली शिकलेल्या आहेत पण मुलांचे शिक्षणाचे प्रमाण मुलींच्या तुलनेत कमी आहे. भविष्यात मुले शिक्षणात पुढे यावीत यासाठी प्रयत्न होण्याची गरज असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
प्रारंभी बेळगावात मंडळाच्या कार्याला सदैव सहकार्य करणारे श्री. शिवाजीराव मुचंडी यांचा सत्कार श्री. विठ्ठल कोले यांच्या हस्ते तर श्री. विक्रांत कालकुंद्रीकर यांचा सत्कार श्री. शिवाजीराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यानंतर श्री.नेताजी जाधव, श्री.कृष्णा शहापूरकर, श्री.सागर हावळाण्णाचे,श्री. शिवाजी केरवाडकर यांचा सत्कार मंडळाचे अध्यक्ष श्री.नारायण रामजी यांच्या हस्ते करण्यात आला. येळ्ळूर ग्रा. पं. अध्यक्ष सतीश पाटील यांचा सत्कार मंडळाचे सचिव लक्ष्मण धुळाप्पा पाटील तर पुण्याचे माजी तहसीलदार एम. बी. पाटील यांचा सत्कार बळीराम देसाई यांनी केला. सर्व सत्कार मूर्तींचा फेटा, स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ प्रदान करून सन्मान करण्यात आला. काही कारणास्तव कार्यक्रमाला अनुपस्थित असलेले श्री.आनंद मेणसे यांचा सत्कार श्री. कृष्णा शहापूरकर यांनी स्वीकारला.
यावेळी कृष्णा शहापूरकर म्हणाले,
सध्याच्या घडीला विवाह जुळविणे हे अतिशय कठीण काम आहे. यामुळे
बेळगाव मित्र मंडळ ट्रस्ट, पुणेच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या सामाजिक उपक्रमांचा एक भाग म्हणून आज आयोजित केलेल्या वधू वर सूचक मेळावा अतिशय उपयुक्त आहे. ट्रस्टचे अध्यक्ष श्री.नारायण रामजी पुण्याच्या बरोबरीनेच
बेळगावसाठीही विविध उपक्रम राबवत आहेत. खरोखरच मंडळाचे हे कार्य स्तुत्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच सत्कार केल्याबद्दल मंडळाचे आभार मानले. याप्रसंगी चंदगड कालकुंद्री येथील एम.बी. पाटील, येळ्ळूर ग्रा. पं. अध्यक्ष सतीश पाटील यांच्यासह मान्यवरांनी आपले विचार मांडले.
या मेळाव्यात एकूण 270 जणांनी विवाहासाठी नोंदणी केली. यात मुलांच्या 75 टक्के तर मुलींच्या 25 टक्के अर्जांची नोंदणी झाली. सकाळपासूनच मेळाव्याच्या ठिकाणी विवाह नोंदणीसाठीच्या अर्जांचे वितरण सुरू होते. मुलांच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा मानला जाणाऱ्या विवाहासाठी त्यांना योग्य जोडीदार मिळावा, यासाठी पालकांनी एकच गर्दी केली होती. यावेळी पुणे येथे नोंदणी झालेल्या मुली आणि मुलांच्या विवाह अर्जांचे सर्वांसमक्ष वाचन करण्यात आले.
सन 1990 मध्ये ससाणेनगर हडपसर पुणे येथे मंडळाची स्थापना करण्यात आली. मंडळ स्थापन झाल्यानंतर 1990 साली गरजूंना वैद्यकीय खर्चासाठी आर्थिक मदत, शैक्षणिक, वैद्यकीय, नोकरी आणि शासकीय क्षेत्रातील अडचणी दूर करून होतकरूंना मदत करण्याचे काम मंडळाने केले आहे आणि ते आजवर अविरत सुरु आहे. मंडळाच्या माध्यमातून पुणे परिसरात 26 जानेवारीला स्नेहमेळावा तसेच
वधू – वर परिचय मेळावे असे कार्यक्रम घेण्यात येतात. बेळगाव भागात मंडळाच्यावतीने आज तगायत तीन वधू-वर परिचय मेळावे घेण्यात आले आहेत आणि आजही झालेला वधू-वर सूचक मेळावा यशस्वी करून मंडळाने बेळगावशी जोडलेली नाळ अजूनही कायम असल्याचे दाखवून दिले.
एकंदरीत मंडळाचे सुयोग्य नियोजन, पालक आणि मुलांच्या लक्षणीय उपस्थितीत मेळावा उत्साहात पार पडला.
Belgaum Varta Belgaum Varta