बेंगळुरू: बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर आणि विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांनी कर्नाटकचे ज्येष्ठ काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांची एआयसीसीच्या नूतन अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. खर्गे यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली काँग्रेस पक्ष आणखीन उंचावर जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मल्लिकार्जुन खर्गे यांची एआयसीसी अध्यक्षपदी निवड झाल्याचा कर्नाटकला अभिमान आहे. खर्गे यांच्या निवडीमुळे काँग्रेसला राज्य पातळीवरच नव्हे तर राष्ट्रीय पातळीवरही अधिक बळ मिळाले आहे.
मल्लिकार्जुन खर्गे यांनी काँग्रेस पक्षाची ५० वर्षे प्रदीर्घ काळ सेवा केली आहे. पक्षनिष्ठा, त्याग आणि संघर्षाची भावना असेल तर चांगली संधी आहे, याचे स्वत: खर्गे साक्षीदार आहेत. शिवाय, यापूर्वी पंतप्रधानपदाचा त्याग केलेल्या सर्वोच्च नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी आता काँग्रेस अध्यक्षपदाचा त्याग करून संपूर्ण देशाला चांगला संदेश दिला आहे. हेब्बाळकर व हट्टीहोळी म्हणाले की, काँग्रेस पक्षातच खरी अंतर्गत लोकशाही व्यवस्था असल्याचे त्यांनी दाखवून दिले आहे.
काँग्रेस पक्षाची संपूर्ण देशात संघटनात्मक वाढ झाली आहे. खरगे अध्यक्षपदी आल्याने कर्नाटकात आणखी वाढ होणार आहे. 2023 च्या विधानसभा आणि 2024 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस कर्नाटकात सर्व पक्षांना मागे टाकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.