बेळगाव : कडोली येथील वैजनाथ गल्ली अनेक वर्षांपासून रस्ता, गटारी, पिण्याचे पाणी, पथदीप अश्या मूलभूत सुविधांपासून वंचित आहे. तसेच जलजीवन पिण्याच्या पाण्यासाठी रस्ता खोदून जलवाहिनी घातल्यामुळे समस्येत आणखीनच भर पडली आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे वाहनधारकांना जीव मुठीत धरून वाहन चालवावे लागत आहे.
वैजनाथ गल्ली ही कडोली येथील मुख्य गजबजलेली गल्ली आहे. या गल्लीतूनच शाळकरी मुलांना शाळेत ये-जा करावी लागते. आरोग्य केंद्र, पशु आरोग्य केंद्र तसेच दूरसंचार निगमचे कार्यालयात देखील याच गल्लीतून जावे लागते तसेच आंबेवाडी, अगसगे गावचा संपर्क रस्ता देखील याच मार्गावर आहे. शिवाय गावकऱ्यांना शेतशीवाराकडे जाण्यासाठी देखील याच रस्त्याचा वापर करावा लागतो. त्यामुळे या रस्त्यावर सतत वाहनांची वर्दळ असते.
सदर रस्ता पाच वर्षांपूर्वी चाळीस लाख खर्चून आमदार सतीश जारकीहोळी यांच्या फंडातून करण्यात आला होता. मात्र निकृष्ट दर्जाच्या कामामुळे अवघ्या 6 महिन्यातच संपूर्ण रस्ता उखडून गेला होता. त्यानंतर या रस्त्याची डागडुजी करण्यात आली होती. मात्र पावसाळ्यात माळरानातून वाहून आलेल्या पाण्यासोबत रस्ता देखील वाहून गेला आहे. पावसाळ्यात माळरानातून वाहून आलेले पाणी नागरिकांच्या घरात शिरून अनेक घरांची पडझड झाली आहे. त्याचप्रमाणे ग्रामपंचायतीचा वरदहस्त लाभलेल्या काही नागरिकांनी अनाधिकृतरित्या नळजोडणी करून घेतली आहे, अशी कुजबुज नागरिकांतून होत आहे. त्याचबरोबर या भागात पथदीप नियमितपणे लावले जाता नाहीत त्यामुळे गल्लीत अंधाराचे साम्राज्य पसरले आहे.
तसेच पिण्याच्या पाण्यासाठी रस्ता खोदून काँक्रिट घातल्यामुळे समस्येत आणखीनच भर पडली आहे. गावकऱ्यांनी वेळोवेळी ग्रामपंचायतीला निवेदन देऊन समस्या सोडविण्याची विनंती केले आहे. मात्र ग्रामपंचायतीकडून समस्या सोडवण्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे संतप्त गावकऱ्यांनी ग्रामपंचायतीला टाळे ठोकण्याचा इशारा दिला आहे.
Belgaum Varta Belgaum Varta