बेळगाव : ऊसाला प्रतिटन 5500 दर मिळावा याकरिता ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी सुरु केलेला संघर्ष अजूनही सुरूच आहे. आजही बेळगाव शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केले.
‘जय जवान’ ‘जय किसान’ चा नारा देत ऊसाला प्रतिटन 5500 रु. दर देण्याची मागणी करत आंदोलकांनी संताप व्यक्त केला. ऊसाला योग्य हमीभाव मिळण्यासाठी संघर्ष सुरू ठेवल्याने शेतकऱ्यांची गळचेपी सुरू असल्याची टीकाही यावेळी करण्यात आली.
यावेळी शेतकरी कार्यकर्ते श्रीशैल अंगडी म्हणाले, आमदार आनंद मामनी यांचा अनादर न करता कित्तुर उत्सवात कोणताही व्यत्यय न आणता आमचे आंदोलन सुरू आहे. ऊसाला योग्य हमीभाव देऊन दिवाळी गोड करण्याचे आश्वासन साखर मंत्री शंकर पाटील मुनेनकोप्प यांनी दिले होते. मात्र त्यांनीही अपेक्षाभंग केला आहे. जोपर्यंत ऊसाला प्रतिटन 5500 रु. दर मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असून भविष्यात तीव्र संघर्ष केला जाईल असा इशारा त्यांनी दिला.
यानंतर आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जाऊन ठिय्या आंदोलन केले. यावेळी बेळगाव, मुडलगी आणि गोकाक तालुक्यातील शेतकरी सहभागी झाले होते.
Belgaum Varta Belgaum Varta