Saturday , October 19 2024
Breaking News

काळा दिन संपूर्ण महाराष्ट्रात पाळला पाहिजे : माजी आमदार के. पी. पाटील

Spread the love

 

बेळगाव : काळा दिन हा फक्त सीमाभागातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात पाळला गेला पाहिजे. केवळ औपचारिकता म्हणून विधिमंडळात ठराव मांडणे आणि भाषण करणे इतकेच महाराष्ट्र सरकार करत आहे. महाराष्ट्र सरकार सीमाप्रश्नांकडे गांभीर्याने पहात नाही. तेव्हा आता महाराष्ट्र सरकारला झोपेतून जागे करायची वेळ आली आहे, असे वक्तव्य राधानगरीचे माजी आमदार राष्ट्रवादीचे के. पी. पाटील यांनी केले आहे.
निषेध फेरीनंतर मराठा मंदिर येथे झालेल्या जाहीर सभेत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मनोहर किणेकर हे होते.
यावेळी बोलताना के. पी. पाटील म्हणाले, सीमालढा हा अनेकांच्या त्यागावर बलिदानावर उभा आहे. हा लढा असाच पुढे नेण्याचे काम तरुण पिढी करत आहे. मराठ्यांना दुहीचा शाप आहे. पण आपला शत्रू कोण हे ओळखण्याची गरज आहे. त्याचबरोबर आपल्यातल्या फितुराणा बाहेरचा रस्ता दाखविण्याची वेळ आता आली आहे. कर्नाटकात मराठी भाषेला न्याय मिळणार नाही त्यासाठी आपण संघटित होऊन पेटून उठण्याची वेळ आता आली आहे. आपण मराठे आहोत शिवरायांचे वंशज आहोत याची जाणीव ठेवून आपसातील मतभेद बाजूला ठेवून एकत्र लढण्याची वेळ आली आहे. आगामी निवडणूक एकसंघ होऊन लढविल्या तर घुसखोरांना बाजूला करणे सहज शक्य आहे.

मनोहर किणेकर यांनी 23 नोव्हेंबर रोजी सीमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी आहे. सीमाप्रश्न हा केवळ सीमावासीयांची नसून महाराष्ट्र सरकारचा आहे. त्यामळे महाराष्ट्र सरकारने जातीने लक्ष द्यावे. आज युवक हजारोंच्या संख्येने फेरीत सहभागी झाले आणि आपली महाराष्ट्र राज्यात जाण्याची इच्छा दाखवून दिली. मराठी शेतकऱ्यांच्या जमिनी हडपण्याचा कुटील डाव सरकारने आखला आहे. मराठी शेतकऱ्यांना भूमिहीन करत देशोधडीला लावण्याचा प्रयत्न करणाऱ्या सरकारच्या विरोधात तीव्र लढा उभारण्यात येणार आहे. त्यामुळे मराठी माणसाने एकसंघ होऊन लढूया व यश खेचून आणू, असे अवाहन करण्यात आले.

मालोजी अष्टेकर यांनी प्रास्तविक भाषणात सीमालढ्याचा इतिहास सांगितला आणि कर्नाटक सरकार मराठी जनतेवर कश्या प्रकारे अन्याय करते हे सांगितले.
मध्यवर्ती म. ए. समितीचे अध्यक्ष दिपक दळवी प्रकृती अस्वास्थ्यामुळे फेरीत सामील होऊ शकले नाहीत. मात्र त्यांच्यातील लढाऊ कार्यकर्ता त्यांना स्वस्थ बसू देईना. त्यामुळे सभेला थोड्या वेळेसाठी ते आले त्यावेळी कार्यकर्त्यानी “कोण आला रे कोण आला समितीचा वाघ आला” असे म्हणत 81 वर्षीय लढवय्यांचे स्वागत केले त्यावेळी युवकांनी लढ्यात सहभागी व्हा. न्याय मिळेपर्यंत लढत रहा. संघर्ष थांबवू नका अशी भावनिक साद यावेळी दीपक दळवी यांनी घातली.
व्यासपीठावर खजिनदार प्रकाश मरगाळे, मनोहर किणेकर, राष्ट्रवादीचे राधानागरीचे माजी आमदार के. पी. पाटील, मालोजी अष्टेकर उपस्थित होते. सभेचे सूत्रसंचलन दत्ता उघाडे यांनी केले तर मदन बामणे यांनी आभार मानले.
यावेळी श्रीरामसेना हिंदुस्थानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर, शिवसेना जिल्हा प्रमुख प्रकाश शिरोळकर, युवा आघाडीचे अध्यक्ष संतोष मंडलिक, युवा नेते आर. एम. चौगुले, सरस्वती पाटील, सुधा भातकांडे, शिवानी पाटील, साधना पाटील, नगरसेवक शिवाजी मंडोळकर, रवी साळुंखे, वैशाली भातकांडे, रणजित चव्हाण-पाटील,सरिता पाटील, महेश बिर्जे, राजू पावले, चंद्रकांत कोंडुस्कर, राजू पावले, सुनील अष्टेकर आदींसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

काळा दिन संदर्भात बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची रविवारी बैठक

Spread the love  बेळगाव : एक नोव्हेंबर काळा दिन संदर्भात बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *