
बेळगाव (प्रतिनिधी) : स्त्रीमध्ये जीवन घडवण्याची शक्ती आहे. जन्मतःच आईची ताकद, वात्सल्य, सहिष्णुता, प्रेम, संयम, काळजी, आदरातिथ्य, सन्मान आणि सांत्वन हे गुण तिच्यात जन्मापासूनच रुजलेले असतात, म्हणूनच सहनशील स्त्री हे शक्तीचे प्रतिक आहे, असे प्रतिपादन बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केले.
अखिल भारत शरण साहित्य परिषद, कदळी महिला वेदिके जिल्हा शाखा यांच्यावतीने बेळगाव जिल्ह्यातील पहिले कदळी महिला संमेलन शहरातील एस. जी. बाळेकुंद्री इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या सभागृहात पार पडले. या संमेलनाच्या समारोपाच्या कार्यक्रमात अध्यक्ष स्थानावरून आ. हेब्बाळकर बोलत होत्या.
पुढे त्या म्हणाल्या, भारतीय संस्कृतीत स्त्रियांना मानाचे स्थान आहे. करुणा, दया, आपुलकी संयम असलेली स्त्री ही एक अद्भुत शक्ती आहे यात शंका नाही. प्राचीन काळापासून स्त्रिया दुर्लक्षित आहेत. परंतु स्वावलंबनातून पुढे आलेल्या राणी कित्तूर चन्नम्मा, झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्यासारख्या महिलांनी स्वतःचे कर्तृत्व सिद्ध केल्यानेचं आज त्यांचे नाव इतिहासात अजरामर झाले असून भावी पिढीसाठी त्या आदर्श आहेत. शिक्षण आणि राजकारणातील अनुभवाच्या जोरावरचं इंदिरा गांधी यांनी भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान होण्याचा मान मिळवलाच शिवाय देशाच्या राजकारणात एक यशस्वी राजकारणी म्हणून नावलौकिक प्राप्त केल्याचे आ. हेब्बाळकर यांनी सांगितले.
‘रामायण’ आणि ‘महाभारत’ यांच्यासारख्या हिंदू महाकाव्यांच्या निर्मितीसाठी महिलाच जबाबदार आहेत. अनेक धर्मग्रंथांमध्ये स्त्रीला ‘जगज्जननी’ असे संबोधले जाते. आपल्या परंपरेतही मुख्य देवता ‘स्त्री’ देवता आहेत. शक्तीची देवी ‘पार्वती’ संपत्तीची देवी ‘लक्ष्मी’ आणि ज्ञानाची देवी ‘सरस्वती’ आहे. आपल्या देशातील गंगा, कावेरी, कृष्णा, नर्मदा, अलकनंदा, गोदावरी, तुंगा, भद्रा या नद्या ‘स्त्री’ नावाने ओळखल्या जातात. इथे स्त्रीला मान सन्मान मिळतो तिथे देवता वास करतात असेही म्हणतात. निसर्ग आणि स्त्रीचे अतूट नाते आहे. त्यामुळे स्त्रीला समृद्धीचे प्रतीक मानले जाते. जर तिला सामर्थ्याच्या बळावर जगायचे असेल आणि सर्व जबाबदारी स्वतः सांभाळायची असेल तर तिने सर्वांना शिस्त लावली पाहिजे असेही त्यांनी स्पष्ट केले. जेव्हा सर्व मुली शिक्षित होतील तेव्हाच आपण संविधानाने कल्पना केलेल्या भारतापर्यंत पोहोचू शकतो याचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केला.
आपल्या देशात कौटुंबिक चालीरीती, संस्कृती, कुटुंब सांभाळण्याची जबाबदारी अगदी पूर्वापारपासूनची आहे. त्यामुळे लहानपणापासूनच तिच्यावर अनेक नियम आणि कायदे लागले जातात. शालेय शिक्षणाच्या संधी पासून वंचित राहिल्याने समाजात साक्षर स्त्रियांचे प्रमाण कमी आहे. महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वर्षानुवर्षे वाढ होत असून देशात महिला आणि मुलींवरील अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. समाजात मोठे परिवर्तन होत असले तरी मुलींचे शोषण टळलेले नाही. भक्कम कायदे करूनही महिलांना द्वितीय श्रेणीचे नागरिक मागण्याची सध्याची प्रवृत्ती बदललेली नाही अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
यावेळी व्यासपीठावर नागपूर रुद्राक्षी मठाचे डॉ. अल्लमप्रभू महास्वामी, डॉ. सुरेश हनगंडी, सौंदत्ती कदळी वेदिकेच्या अध्यक्षा विजया हंपन्नावर, कदळी वेदिकाच्या मानद अध्यक्षा राजेश्वरी कवटगीमठ, जिल्हाध्यक्षा प्रेमक्का अंगडी, कदळी महिला शाखेच्या अध्यक्षा शैला हिरेमठ, सुनंदा एम्मी आदि उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta