Thursday , March 5 2026
Breaking News

28 नोव्हेंबरच्या चाबूक मोर्चासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Spread the love

 

बेळगाव : रिंगरोड विरोधात शेतकऱ्यांचा भव्य चाबूक मोर्चा 28 नोव्हेंबर रोजी काढण्यात येणार आहे. काळ्या आईला वाचविण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढण्याचा निर्धार करत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
बेळगाव शहर परिसरातून रिंगरोड करण्यात येणार आहे.यामध्ये अनेक एकर सुपीक जमीन या रिंगरोडमध्ये जाणार असल्यामुळे अनेक शेतकरी भूमिहीन होणार आहेत. रिंगरोडला विरोध दर्शविण्यासाठी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर आक्षेप नोंदविला आहे. रिंगरोड रद्द होईपर्यंत हे आंदोलन चालू ठेवण्याचा निर्धार करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने महाराष्ट्र एकीकरण समितीच्या माध्यमातून रिंगरोडला विरोध दर्शविण्यासाठी 28 नोव्हेंबर रोजी भव्य चाबूक मोर्चा काढण्याचे ठरविण्यात आले आहे.
रिंगरोडसाठी जवळपास 1300 एकर जमीन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण ताब्यात घेणार आहे. यासाठी शेतकऱ्यांनी तीव्र लढा पुकारला आहे. काळ्या आईला वाचविण्यासाठी प्राण गेला तरी बेहत्तर मात्र रिंग रोडसाठी एक इंच जमीन सरकारला देणार नाही हे ठणकावून सांगण्यासाठी म. ए. समितीच्या माध्यमातून हा चाबूक मोर्चा काढण्यात येणार आहे. येत्या 10 दिवसात हा प्रकल्प रद्द झाला तर ठिक अन्यथा चाबूक मोर्चा हा निघणारच. या मोर्चात शेतकरी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरणार आहे. यामध्ये जर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर त्याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार असेल. विकासाच्या नावावर शेतकऱ्याला उध्वस्त करण्याचा डाव कदापि यशस्वी होऊ देणार नाही. आम्ही आमच्या जमिनी कोणत्याही परिस्थितीत देणार नाही असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
बेळगाव शहराची वाहतूक समस्या निवारण्यासाठी रिंगरोड हा पर्याय नाही त्याऐवजी उड्डाणपुले निर्माण केले तर वाहतुकीची समस्या निर्माण होणार नाही. बळीराजा आपली जमीन वाचविण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढेल. तेव्हा सरकारने रिंगरोड प्रकल्प रद्द करून उड्डाण पुले हा पर्याय स्वीकारावा, असे मत माजी आमदार मनोहर किणेकर यांनी व्यक्त केले.

माजी आमदार मनोहर किणेकर यांच्या नेतृत्वाखाली सादर करण्यात आलेल्या निवेदनाचा स्वीकार जिल्हाधिकाऱ्यांच्या सहाय्यकाने केला असून यावेळी माजी महापौर शिवाजी सुंठकर, आर. एम. चौगुले, सुनील अष्टेकर, ऍड. एम. जी. पाटील, ऍड. सुधीर चव्हाण, श्याम पाटील, सरस्वती पाटील आदिंसह कार्यकर्ते उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

कणबर्गीतील सिद्धेश्वर मंदिरात संशयास्पद कार

Spread the love  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील कणबर्गी गावातील प्रसिद्ध श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरात गेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *