बेळगाव : कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांच्या बेताल वक्तव्याचे पडसाद पुणे जिल्ह्यातील दौंड येथे उमटलेत. महाराष्ट्रातील 40 गावे कर्नाटकात समाविष्ट करण्याची दरपोक्ती कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्माई यांनी केली आहे. त्यांच्या या वक्तव्याचे तीव्र पडसाद महाराष्ट्रात उमटत आहेत. दौंड येथील मराठा महासंघाच्या कार्यकर्त्यांनी कर्नाटकच्या बसला काळे फासून “जय महाराष्ट्र” असा मजकूर लिहिला आहे.
मुख्यमंत्री बोम्माई यांनी सीमाप्रश्नी कर्नाटक सरकारकडून तज्ञ वकिलांची समिती नेमल्यानंतर सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील गावे कर्नाटकात समाविष्ट करून घेण्याचा विचार करत आहेत, असे बेताल वक्तव्य केले होते. त्यानंतर महाराष्ट्रचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राच्या उच्चधिकार समितीची बैठक घेऊन सीमाप्रश्नी सुप्रीम कोर्टात आपली बाजू भक्कमपणे मांडण्यासाठी ज्येष्ठ विधि तज्ञ वैद्यनाथन यांची नियुक्ती केली होती तसेच महाराष्ट्रातील एकही गाव जाऊ देणार नाही. उलट सर्वोच्च न्यायालयात भक्कम बाजू मांडून बेळगावसह कारवार, खानापूर आणि मराठीबहुल सीमाभाग महाराष्ट्रात घेण्यासाठी प्रयत्न करू, असे मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले. त्यामुळे बोम्माई यांनी काल पुन्हा एकदा सोलापूर, अक्कलकोट हा कानडीबहुल भाग असल्यामुळे तोही कर्नाटकात सामील करून घेण्याचा विचार सुरू असल्याचे वक्तव्य करत महाराष्ट्राला डिवचण्याचा प्रयत्न केला होता. त्याचेच पडसाद महाराष्ट्रात उमटत असल्याचे दिसून येत आहे. दौंड निपाणी आगाराच्या बसवर लाल रंगाने “जय महाराष्ट्र” असे लिहून काळ्या रंगात कर्नाटक सरकरचा निषेध असा मजकूर लिहीत निषेध व्यक्त केला आहे.