जागृती सभेत येळ्ळूरवासियांचा निर्धार
येळ्ळूर : राष्ट्रीय महामार्ग व रस्ते प्राधिकरण मंडळाने बेळगाव शहराभोवती दहा ते बारा किलोमीटर अंतरावर रिंग रोड तयार करण्याचा घाट घातला आहे. शेतकऱ्यांच्या पिकाऊ जमिनी जाऊन शेतकरी देशोधडीला लागणार आहेत. सदर रिंग रोड प्रस्ताव हाणून पाडण्याचा निर्धार येळ्ळूर विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीने आयोजित केलेल्या रिंग रोड विरोधी चाबूक मोर्चा जागृती सभेत येळ्ळूरवासियांनी केला आहे. या सभेच्या अध्यक्षस्थानी शांताराम कुगजी हे होते.
यावेळी बेळगाव तालुका महाराष्ट्र समितीचे कार्याध्यक्ष श्री. मनोहर किणेकर यांनी, रिंग रोडमुळे येथील शेतकरी भिके कंगाल होणार असून उरली सरली जमीन सुद्धा सरकार ताब्यात घेणार आहे शेत जमीनी शाबूत राहिल्या तरच आपला शेतकरी बुवाचेल, असे सांगितले.
मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे उपाध्यक्ष भाई राजाभाऊ पाटील यांनी शेतकऱ्यांच्या लढ्यात येळ्ळूरने महत्वाची भूमिका बजावली आहे. पहिली शेतकरी संघटना या गावात उभी टाकली होती. त्या संघटनेने अनेक लढे देऊन जिंकले आहेत. रिंग रोडला विरोध करण्यासाठी रस्त्यावरची लढाई महत्त्वाची आहे. महात्मा जोतीराव फुले पुण्यतिथी दिवशी हा चाबूक मोर्चा होतो आहे, हेही आवर्जून सांगितले. माजी महापौर शिवाजी सुंठकर म्हणाले, या चाबूक मोर्चाला सर्व भाषिक शेतकरी प्रचंड संख्येने सामील होतील आणि हा रिंग रोड गाढून टाकतील, असे ठणकावून सांगितले.
याप्रसंगी कर्नाटक राज्य रयत संघटनेचे अध्यक्ष. श्री. सिद्धगौडा मोदगी, मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे खजिनदार श्री. प्रकाश मरगाळे, मनोज पावशे, श्रीराम सेनेचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर, तालुका म. ए. समितीचे सरचिटणीस एम. जी. पाटील, मार्कंडेय साखर कारखान्याचे संचालक आर. आय. पाटील, युवा नेते आर. एम. चौगुले, शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस विलास घाडी, ऍड. श्याम पाटील. ऍड. सुधीर चव्हाण, विकास कलघटगी, आंबेवाडी ग्रामपंचायत अध्यक्ष श्री. चेतन पाटील, एस. एल. चौगुले इत्यादींनी आपले विचार मांडले.
येळ्ळूर ग्रामपंचायत अध्यक्ष श्री. सतीश पाटील यांनी येळ्ळूरगावचा पाठिंबा व्यक्त केला. येळ्ळूर विभाग समितीचे चिटणीस श्री. प्रकाश अष्टेकर यांनी सूत्रसंचालन केले. युवा समितीचे उपाध्यक्ष श्री. दत्ता उघाडे यांनी प्रस्तावित केले.
या जागृती सभेला येळ्ळूर विभाग एपीएमसी सदस्य महेश जुवेकर, ग्रामपंचायत सदस्य रमेश मेणसे, शिवाजी नांदुरकर, शिवाजी सायनेकर, गोपाळ शहापूरकर, नारायण बसवाडकर, परशराम घाडी, प्रकाश मालूचे वाय. सी. इंगळे, नागेंद्र पाखरे, दौलत पाटील, बंडू देसाई, पांडुरंग मेलगे, शांताराम बेडके, प्रकाश पाटील, भरत मासेकर, सो मनीषा घाडी शालन पाटील, वनिता परीट, मनोहर घाडी, शिवाजी कदम इत्यादी बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.
शेवटी कार्याध्यक्ष श्री. दुधाप्पा बागेवाडी यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta