बेळगाव : दोन गटात झालेल्या मारहाणीतून एका युवकाचा मृत्यू झाल्याची घटना आज भारतनगर, शहापूर येथे घडली आहे. विनायक शिवाजी निच्चळ (वय ३८) असे मृत युवकाचे नाव आहे. किरकोळ वादातून झालेल्या मारहाणीतून सदर युवकाचा मृत्यू झाला आहे.
शुक्रवारी रात्री ११ च्या सुमारास लघुशंकेवरून वाद सुरु झाले. मृत विनायक आणि त्याचा मित्र हे दोघेही लघुशंकेसाठी गेलेले दिसल्याने सदर जागा हि लघुशंकेची आहे का? असा जाब दुसऱ्या गटातील युवकांनी विचारला.
यावरून सुरु झालेल्या किरकोळ वादावादीचा प्रकार हाणामारीत बदलला. त्यानंतर स्थानिकांनी शुक्रवारी रात्रीच हा वाद मिटवला होता. मात्र शनिवारी सकाळी विनायकच्या छातीत त्रास सुरू झाल्याने त्याने कुटुंबियांना सांगितला. त्याला तातडीने केएलई इस्पितळात उपचारासाठी हलविण्यात आले. मात्र इस्पितळात पोहोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.
यानंतर विनायकच्या कुटुंबियांनी दुसऱ्या गटातील तरुणांवर तक्रार दाखल केली असून सर्व तरुणांवर खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणी शहापूर पोलिसात गुन्हा नोंद झाला असून पोलिस निरीक्षक सुनील कुमार एच. अधिक तपास करत आहेत.
मयत विनायक यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन लहान मुले असा परिवार आहे. या कुटुंबाचा अधारवड हिरावल्याने पत्नी व मुलांना वाली कोण अशी विचारणा करत हळहळ व्यक्त होत आहे.
दरम्यान आरोपींना तत्काळ अटक करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी वाढू लागली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta