बेळगाव : बेळगावचे सरदार हायस्कूल मैदानाचा वापर फक्त खेळांसाठी व्हावा. तेथे सभा, समारंभांना व अन्य उपक्रमांना परवानगी देऊ नये, अशी मागणी क्रिकेटप्रेमींनी केली आहे.
बेळगावातील कंग्राळ गल्ली येथील केजीबी स्पोर्ट्स असोसिएशनच्या नेतृत्वाखाली मंगळवारी क्रिकेटपटू व इतर खेळाडूंनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठून जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत निवेदन दिले.
निवेदन दिल्यानंतर वकील इरफान बयाल आणि शरद पाटील यांनी सांगितले की, बेळगावात सध्या खेळांसाठी मोकळे असलेले सरदार मैदान हे फक्त एकच आहे. शहरातील अनेक खेळाडू येथे क्रिकेट खेळतात. मात्र याठिकाणी सभा, समारंभ व अन्य उपक्रमांना परवानगी देण्यात येत असल्याने खेळाडूंची अडचण होत आहे. त्याशिवाय मैदानाची नासधूस केली जात आहे. तसेच मैदानाची कोणत्याही प्रकारे स्वच्छता केली जात नाही. रात्रीच्यावेळी येथे अनैतिक कारवाया सुरू असतात. तसेच कचरा टाकून प्रदूषण केले जात असल्याची तक्रार त्यांनी केली. याठिकाणी अनेकजण सकाळी मॉर्निंग वॉक करतात. अनेकजण क्रिकेट खेळतात. त्यामुळे या मैदानावर यापुढे कोणताही कार्यक्रम, रॅली, प्रदर्शनाला परवानगी देऊ नये अशी मागणी त्यांनी केली.
यावेळी सुहास अडकुरकर, सुनील नायडू, नामदेव हुंदरे, मैनु पठाण, मोशीन आजरेकर, परशुराम तोरे, शिरीष बाळेकुंद्री, रोहित निर्मळकर, सागर पाटील आदी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta