Saturday , October 19 2024
Breaking News

तज्ञ समिती अध्यक्ष खासदार धैर्यशील माने यांना महामेळाव्यासाठी समितीचे निमंत्रण

Spread the love

 

बेळगाव : हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच 19 डिसेंबर रोजी होणाऱ्या सीमावासीयांच्या महामेळाव्याला आपल्या संघटनेच्या प्रतिनिधीला पाठवून सीमावासीयांचा आवाज बुलंद करावा, अशी विनंती मध्यवर्ती म. ए. समितीतर्फे महाराष्ट्राचे सकल मराठा संयोजक दिलीप पाटील व तज्ञ समितीचे अध्यक्ष खासदार धैर्यशील माने यांना एका पत्राद्वारे करण्यात आली आहे.
1956 साली भाषावार प्रांतरचना झाली आणि मराठी भाषिकांचा फार मोठा प्रदेश अन्यायाने म्हैसूर राज्यात (सध्याचे कर्नाटक) डांबण्यात आला. हा प्रदेश महाराष्ट्रात समाविष्ट करण्यासाठी येथील मराठी भाषिक जनता गेली 66 वर्षे विविध मार्गाने प्रयत्न करीत आहे. सत्याग्रह, मोर्चे, धरणे, उपोषणे, पंतप्रधान आणि गृहमंत्री यांच्या भेटीगाठी अशा विविध मार्गांनी प्रयत्न सुरू आहेत. अनेक वेळा प्रयत्न करूनही प्रश्नाची सोडवणूक न झाल्याने महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात दावा दाखल केला आहे. महाराष्ट्राने दावा दाखल केल्यानंतर कर्नाटक सरकारने बेळगाववर आपला हक्क सांगण्यासाठी एका खाजगी संस्थेच्या जागेत 2006 पासून अधिवेशन घेण्यास सुरुवात केली. त्यानंतर कर्नाटक सरकारने बेळगावमध्ये सुवर्ण विधानसौध बांधून आपला हक्क सिद्ध करण्याचा प्रयत्न चालू केला आहे. मराठी जनतेवर विविध तऱ्हेने अन्याय चालू केला आहे. मराठी भाषेत कोणतेही कागदपत्र न देणे, वेगवेगळ्या कारणास्तव कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करून त्यांचे भविष्य अंधकारमय करणे, महाराष्ट्रीय नेत्यांना बेळगावात येण्यास प्रतिबंध करणे इत्यादी गोष्टी कर्नाटक सरकार करीत आहे.

महाराष्ट्र सरकारने या गोष्टींकडे गांभीर्याने पाहणे महत्त्वाचे आहे. बेळगाव जवळील सुवर्ण सौधमध्ये ज्यावेळी कर्नाटक सरकार अधिवेशन घेते. त्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी बेळगावात मराठी जनतेच्या मेळाव्याचे आयोजन करून महाराष्ट्रात सामील होण्याची इच्छा प्रकट केली जाते.
पहिल्या वर्षी सन 2006 साली कै. आर. आर. पाटील उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य बेळगाव हजर होते. त्यानंतर सीमा भागातील मराठी जनतेच्या पाठीशी महाराष्ट्र सरकार आहे असे महाराष्ट्रातील नेत्यांनी वेळोवेळी दाखवून दिले आहे. येत्या 19 डिसेंबर 2022 ला बेळगावात कर्नाटक विधानसभेचे अधिवेशन होणार आहे. त्या दिवशीच्या मेळाव्यास आपण किंवा आपल्या संघटनेतील प्रतिनिधी उपस्थित राहून सीमावासियांचा आवाज बुलंद करावा, अशी आपल्याला नम्र विनंती आहे, असा तपशील सकल मराठा संयोजक महाराष्ट्र राज्य दिलीप पाटील यांना धाडलेल्या पत्रामध्ये नमूद आहे. या पत्रावर मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी, कार्याध्यक्ष मनोहर किणेकर, सरचिटणीस मालोजीराव अष्टेकर आणि खजिनदार प्रकाश मरगाळे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

About Belgaum Varta

Check Also

काळा दिन संदर्भात बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची रविवारी बैठक

Spread the love  बेळगाव : एक नोव्हेंबर काळा दिन संदर्भात बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *