बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने 19 रोजी आयोजित करण्यात आलेला महामेळावा हा लोकशाहीने त्यांना दिलेला अधिकार आहे, असे मत विधानसभेचे सभापती विश्वेश्वर हेगडे कागेरी यांनी व्यक्त केले. कर्नाटक विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन येथील सुवर्णसौधमध्ये 19 डिसेंबरपासून सुरु होत आहे. त्याच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी ते सुवर्णसौधमध्ये आले असता पत्रकारांशी बोलत होते.
यावेळी काही कन्नड पत्रकारांनी त्यांना म. ए. समितीच्यावतीने महामेळावा होत आहे. यामध्ये कर्नाटकविरोधात वक्तव्य केली जातात. यासंदर्भात तुम्ही काय कारवाई करणार का? असा खोचक सवाल केला. यावेळी हेगडे कागेरी म्हणाले की, समितीला लोकशाहीच्यावतीने देण्यात आलेला हा अधिकार आहे. या संदर्भात मी काही बोलू इच्छित नाही. लोकशाहीमध्ये कुणाचा आवाज दाबता येत नाही. मात्र या मेळाव्यासंदर्भात स्थानिक प्रशासन आणि राज्य शासन निर्णय घेईल. यासंदर्भात मी अधिक काही बोलणार नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.