बेळगाव : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर कार्मिक आणि प्रशासकीय सुधारणा विभागाच्या सचिव पी. हेमलता यांनी जिल्हा प्रशासनाने केलेल्या तयारीचा आढावा घेतला. आज मंगळवारी (13 डिसेंबर) बेळगावातील सुवर्णासौधला पी. हेमलता यांनी भेट दिली आणि विविध व्यवस्थेची पाहणी करून अधिकाऱ्यांची बैठक घेतली.
सुवर्णविधान सौधतील फर्निचर, साऊंड सिस्टीम, इंटरनेट सिस्टीम, पिण्याचे पाणी, स्वच्छता यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात.
अधिवेशन सुरू झाल्यानंतर कोणतीही दुरुस्ती किंवा अन्य काम करता येणार नाही. त्यामुळे सर्व कामे अगोदरच पूर्ण करावीत, असे पी. हेमलता यांनी सांगितले.
प्रशासनात ई-ऑफिस प्रणाली कार्यान्वित करण्यात आल्याने पुरेसे इंटरनेट कनेक्शन उपलब्ध करून द्यावे, असे निर्देश त्यांनी दिले.दररोज व्हिडिओ कॉन्फरन्स होणार असल्याने उच्च क्षमतेचे ब्रॉडबँड कनेक्शन दिले जावे.
सुवर्णसौधमधील खोल्या, हॉल, बँक्वेट हॉल आणि परिसराच्या बाहेरील सर्व भागांमध्ये दैनंदिन स्वच्छता नियमितपणे करावी, असे ही सचिव हेमलता यांनी अधिकार्यांना निर्देश दिले.
जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी अधिवेशनाच्या तयारीसाठी स्थापन करण्यात आलेल्या विविध उपसमित्यांच्या कामकाजाची व प्रगतीची माहिती दिली.
मंत्री, आमदार, उच्चस्तरीय अधिकारी, मंत्रालयातील अधिकारी/कर्मचारी यांना निवास सुविधांचे वाटप सुरू आहे. याशिवाय वाहतूक आणि जेवणाची व्यवस्था करण्यासाठी पावले उचलण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
आंदोलने होणार असल्याने सुरळीत व्यवस्थापनासाठी तक्रार व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आली असून उपविभागीय अधिकारी व पोलीस अधिकारी समन्वय साधतील, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या यांनी सुरक्षा उपाययोजनांची माहिती दिली.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अरुण पाटील यांनी सांगितले की, सुवर्ण विधान सौधमध्ये फर्निचर, साऊंड सिस्टीम, इंटरनेट व्यवस्था, पिण्याचे पाणी, स्वच्छतेसाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
जिल्हा पंचायतचे मुख्य कार्यकारी अधिकारी दर्शन, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. संजीव पाटील उपस्थित होते. बैठकीला निवास, भोजन, वाहतूक, विविध विभागांचे अधिकारी यांच्यासह सर्व उपसमित्यांचे प्रमुख सहभागी झाले होते.
Belgaum Varta Belgaum Varta