बेळगाव : कर्नाटक विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनासाठी बेंगळूरहून बेळगावमध्ये दाखल झालेल्या कर्नाटक राज्य कृषी ग्रामीण विकास बँकेच्या मालकीच्या वाहनावर सुवर्ण विधानसौध समोर काही अज्ञातांनी दगडफेक केली. बुधवारी सायंकाळी हिरेबागेवाडी (ता. बेळगाव) पोलीस स्थानकाच्या हद्दीत ही घटना घडली. यावेळी वाहन चालकावरही हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
या घटनेनंतर माध्यमांशी बोलताना कर्नाटक राज्य कृषी ग्रामीण विकास बँकेचे चालक चेतन म्हणाले, दगडफेक करणारे मराठीत बोलत होते. मी बेंगळूरहून आलो आहे. मला या गावाचे नाव माहित नाही. या घटनेनंतर जीवाच्या आकांताने मी तातडीने वाहनासहित तिथून निसटलो, वरिष्ठांना या घटनेबाबत कळविण्यात आले आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
या प्रकरणाची हिरेबागेवाडी पोलीस स्थानकात नोंद झाली आहे. अज्ञात हल्लेखोरांवर गुन्हा दाखल करून पोलिस अधिक तपास करत आहेत.