बेळगाव : बेळगाव उत्तर मतदार संघामध्ये बेळगावमधली पहिली पब्लिक ई सायकल बाईक शेअरिंग व्यवस्था साकारली आहे. आज शनिवारी चन्नमा सर्कल येथे या व्यवस्थेचे आ. अनिल बेनके यांनी जिल्हाधिकारी नितीश पाटील तसेच स्मार्ट सिटीचे एमडी प्रवीण बागेवाडी यांच्या उपस्थितीत उद्घाटन केले.
वेळ, पैसे आणि पर्यावरणाचे रक्षण करण्याच्या हेतूने आणि स्वास्थ्यही राखता येईल यासाठी पब्लिक ई सायकल बाईक शेअरिंग व्यवस्था सुरु करण्यात आली आहे. बेळगावात प्रथमच अशा अनोख्या यंत्रणेची सुरुवात करण्यात आली आहे. शनिवारी सकाळी चन्नमा सर्कल येथे आ. अनिल बेनके यांनी या प्रणालीचे उद्घाटन केले.
या संदर्भात प्रसारमाध्यमांना माहिती देताना आ. अनिल बेनके म्हणाले, यांनी बेळगाव मधील गरीब जनतेला उपयुक्त अशी ही प्रणाली आहे. सर्वानी याचा सदुपयोग करून घ्यावा. यामुळे पेट्रोल तर वाचेल शिवाय प्रदूषण देखील होणार नाही. जिल्हाधिकारी डॉ. नितीश पाटील यांनी या प्रणालीची माहिती देताना सांगितले की, बेळगाव शहरात प्रथमच पब्लिक बायसिकल, ई बायसिकल आणि ई बाईक शेअरिंग सिस्टीम व्यवस्था सुरु करण्यात आली असून नागरिकांना माफक दरात सायकली भाड्याने मिळण्याची व्यवस्था केली आहे. बेळगाव उत्तर मतदारसंघात अशी सुमारे 20 स्टेशन्स सुरु करण्यात आली आहेत. तेथे ई पेमेंट पद्धतीने भाडे भरण्याची सुविधा आहे. भाड्याचे दरपत्रकही लावलेली आहेत. पब्लिक बायसिकल, ई बायसिकल आणि ई बाईक या तिन्ही प्रकारच्या प्रत्येकी 100 म्हणजेच एकूण 300 ई बाईक असून,. पर्यावरणाचे रक्षण करण्यासह वेळ आणि पैसे वाचविण्यासाठी याची नागरिकांना मदत होईल. सुवर्णसौध जवळ देखील ही सुविधा देण्यात आली आहे. नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी स्मार्ट सिटीचे एमडी प्रवीण बागेवाडी, माजी आ. संजय पाटील, मुरघेन्द्रगौडा पाटील तसेच भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.