बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील रामदुर्ग तालुक्यातील चुंचनूर जवळ भीषण अपघात झाला आहे. यात 6 जण ठार झाले आहेत. 4 जानेवारीच्या मध्यरात्री हा अपघात झाला असून हे सर्वजण साैंदत्ती यल्लम्मा देवीच्या दर्शनासाठी जात होते.
रामदुर्ग तालुक्यातील हुलकुंद गावातील हनुमाव्वा म्यागाडी (25), दीपा (31), सविता (17), सुप्रीता (11), मारुती (42) आणि इंद्रव्वा (24) अशी मृतांची नावे आहेत. वाहन एका वटवृक्षाला धडकल्याने पाच भाविकांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य एका भाविकाचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला, असे पोलिसांनी सांगितले.
घटनेचे वृत्त समजताच जिल्हा पोलीस अधीक्षक संजीव पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत घटनास्थळाची पाहणी केली. याप्रकरणी रामदुर्ग तालुक्यातील काटकोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाच लाखांची भरपाई
रामदुर्ग तालुक्यातील चिंचनूरजवळ झालेल्या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या सहा जणांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा जिल्ह्याचे पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी केली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta