खानापूर : बेळगाव, बागलकोट, धारवाड गदग या जिल्ह्यांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी कळसा-भांडुरा प्रकल्पाला मंजुरी देऊन एक प्रकारे खानापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचा घाट केंद्र व कर्नाटक राज्य भाजपा सरकारने घातला आहे.
केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे खानापूर तालुक्यातील जनतेला कोणत्या पद्धतीचा धोका निर्माण होणार आहे याचा अभ्यास न करता केवळ पक्षीय बेडकुळ्या दाखविण्याच्या नादात खानापूर तालुका भाजपातर्फे “सरकारचे अभिनंदन” कार्यक्रम करण्यात आला. सदर कार्यक्रम म्हणजे ‘सरकारचे अभिनंदन की ‘आपणच रचले आपले सरण’ असेच म्हणावे लागेल.
कळसा -भांडुरा प्रकल्पाच्या पाण्याचा खानापूर तालुक्याला एका थेंबाचाही फायदा होणार नाही त्याउलट नदीकाठची पिकावू जमीन पाण्याखाली येईल व शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. खानापूर तालुक्यातील पश्चिम भागातील नेरसा गावाची पिकावू जमीन या प्रकल्पात जाणार आहे. सदर पाणी भुयारी मार्गातून हुबळी धारवाड या जिल्ह्याकडे वळवले जाणार आहे मात्र यामुळे नेरसा भागातील शेतकरी देशोधडीला लागणार आहे. त्याचप्रमाणे मलप्रभा काठच्या सर्व गावांत पावसाळ्यात पूर परिस्थिती निर्माण होणार आहे. असे असताना खानापूर तालुक्यातील भाजपा कश्याच्या आधारे सरकारचे अभिनंदन करत आहे याचा विचार खानापूर तालुक्यातील जनतेने करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर या प्रकल्पामुळे पुढे निर्माण होणारे धोके, नदीचे वाढणारे पाणी आजूबाजूच्या घरांना होणारा धोका, शेतीचे होणारे नुकसान, जंगल संपत्तीचे होणारे नुकसान, पर्यावरणाचा होणारा ऱ्हास या सगळ्या गोष्टीचा विचार करता एक गोष्ट म्हणावीशी वाटते की म्हादाई प्रकल्प आणि खानापूर भाजपाने काढलेली “सरकारचे अभिनंदन” कार्यक्रम म्हणजे “आपणच रचिले आपले सरण”.