बेळगाव : शाकंभरी पौर्णिमेच्या निमित्ताने सौन्दत्ती येथील यल्लम्मा देवीच्या दर्शनाहून परतल्यानंतर एकत्रित पडली पूजनाचा कार्यक्रम करून त्यानंतर आपापल्या घरी जातात. याला नवगोबाची यात्रा म्हणून ही यात्रा साजरी केली जाते. वर्षानुवर्षे ही नावगोबाची यात्रा मध्यवर्ती बस स्थानकाच्या जागेत पार पडत होती. मात्र आता या जागेत नवीन बस स्थानक बांधण्यात आल्यामुळे ही यात्रा 10 जानेवारी रोजी शिवाजीनगर येथील पेट्रोलपंपच्या समोरील खुल्या जागेत भरणार आहे.
वर्षानुवर्षे ही यात्रा केएसआरटीसीच्या जागेत भरविली जात होती. सदर 35 गुंठे जागा ही संरक्षण दलाच्या मालकीची होती मात्र आता मध्यवर्ती बस स्थानकामुळे ही जागा नाहीशी झाली आहे. त्यामुळे संरक्षण दल व केएसआरटीसीचे वरीष्ठ अधिकारी यांच्यात चर्चा झाली व चर्चेअंती केएसआरटीसीला शिवाजीनगर येथील पर्यायी जागा देण्याचे ठरले असून बेळगांव देवस्थान कमिटीला लक्ष्मी मैदानाची दोन गुंठे जागा राखीव ठेवण्याचा ठराव संमत झाला आहे. उत्तरचे आमदार अनिल बेनके यांच्या प्रयत्नातून लक्ष्मी मैदानाची अधिकृत जागा कागदोपत्री बेळगाव देवस्थान कमिटीच्या नावावर होणार आहे. संरक्षण खात्याच्या वतीने कर्नाटक सर्कलचे डिफेन्स इस्टेट ऑफिसर बी.अजित रेड्डी यांनी एका पत्राद्वारे जागा हस्तांतराची प्रक्रिया पार पडण्याची सूचना आमदार अनिल बेनके यांनी केली आहे.
योगायोगाने उद्या सौंदत्ती यल्लमा यात्रोत्सव आटोपून येणाऱ्या भाविकांची श्री नावगोबा यात्रा असल्यामुळे आज सोमवारी आमदार बेनके यांनी बेळगाव देवस्थान कमिटीच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांना लक्ष्मी मैदान येथे बोलावून घेऊन त्यांना संरक्षण खात्याकडून आलेल्या पत्राची माहिती दिली. तसेच त्या पत्राची प्रत देवस्थान कमिटीकडे सुपूर्द केली.
त्याचप्रमाणे लक्ष्मी मैदानाच्या दोन गुंठे जागे संदर्भातील कागदपत्रे लवकरच देवस्थान कमिटीकडे सुपूर्द केली जातील असे आश्वासन दिले आहे. याप्रसंगी बेळगाव देवस्थान कमिटीचे अध्यक्ष माजी नगरसेवक रणजीत चव्हाण पाटील, उपाध्यक्ष रमाकांत कोंडुसकर, राहुल मुचंडी, प्रा. आनंद आपटेकर वसंत हलगेकर, परशराम माळी, सुनील जाधव, परशराम जाधव, राजू हलगेकर आदींसह श्री यल्लमा देवीचे सर्व पुजारी उपस्थित होते.