बेळगाव (प्रतिनिधी) : नैऋत्य रेल्वेने देसूर ते के.के. कोप्प पर्यंत नवीन रेल्वे ट्रॅकसाठी प्रस्ताव मांडला असून नंदिहळ्ळी परिसरातील सुपीक जमीन संपादित करण्याचा घाट घातला आहे. ग्रामस्थांचा विरोध नजुमानता या प्रस्तावाला ग्रीन सिग्नल देण्यात आला आहे.
सदर ट्रॅकच्या माध्यमातून अनेक गावे हुबळीशी जोडण्याचा प्रस्ताव असून रेल्वे ट्रॅकसाठी जमीन संपादित केल्यास गावातील बहुसंख्य शेतकरी देशोधडीला लागणार आहेत. कारण काही शेतकऱ्यांचा चरितार्थ केवळ या जमिनीवरच अवलंबून आहे. मात्र खासदारांच्या दबावाखाली असलेले रेल्वे अधिकारी या जमिनी संपादित करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र या जमिनी संपादित करण्यासाठी ग्रामस्थांचा विरोध आहे.
याच पार्श्वभूमीवर आज तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते मनोहर किणेकर आणि माजी महापौर शिवाजी सुंठकर यांच्या नेतृत्वाखाली सर्कल ऑफिसर राजू गलगली आणि तलाठी मंजुनाथ टिप्पोजी यांच्यामार्फत पंतप्रधानांसाठी निवेदन देण्यात आले.
सुपीक जमिनी संपादित करून त्यावर रेल्वे ट्रॅक तयार करण्याऐवजी माळरानातील जागेत रेल्वे ट्रॅकची निर्मिती करावी, अशी विनंती या निवेदनातून गावकरी आणि शेतकऱ्यांनी केली आहे. याबाबत संबंधित गावातील शेतकऱ्यांनी रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांच्यासह दिवंगत खासदार सुरेश अंगडी आणि इतर लोकप्रतिनिधींशी संपर्क साधून आपली कैफियत मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र सातत्याने त्यांच्या पदरी निराशा आली. कर्नाटक उच्च न्यायालयाकडून जमीन संपादनाला स्थगिती मिळाली असतानाही याचा कोणताच उपयोग न झाल्याने, पंतप्रधानांनी या प्रश्नाकडे लक्ष द्यावे, अन्यथा सामूहिक आत्महत्या करण्याचे पाऊल उचलावे लागेल असा इशारा शेतकऱ्यांनी या निवेदनातून दिला आहे.
यावेळी माजी आमदार मनोहर किणेकर, माजी महापौर शिवाजी सुंठकर, नंदिहळ्ळी ग्रा. पं. अध्यक्षा सुवर्णा हंपन्नावर, उपाध्यक्ष मल्लिकार्जुन लोकूर, सर्व ग्रा. पं. सदस्य ग्रामस्थ व शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते.