बेळगाव : कॅपिटल वन आयोजित एकांकिका स्पर्धेचा पाहिल्या दिवशी बेळगाव जिल्हा मर्यादित शालेय गट आणि आंतरराज्य मराठी एकांकिका गट अशा दोन विभागात स्पर्धेला दिमाखात लोकमान्य रंगमंदिर येथे सुरुवात झाली. सकाळच्या सत्रात एकूण 4 बालनाट्य सादर करण्यात आली. यामध्ये कॉमन टच बेळगाव यांनी वारी, विद्यानिकेतन हायस्कूल बेळगाव यांनी किल्ल्यातील चेटकीण, महिला विद्यालय हायस्कूल बेळगाव यांनी सत्यम शिवम सुंदरम तर राहुल मोहनदास प्रोडक्शन बेळगांव यांनी अविस्मरणीय हॅप्पी डेज या एकांकिका सदर करण्यात आल्या.
दुसऱ्या सत्रात आंतरराज्य मराठी एकांकिका स्पर्धेअंतर्गत दुपारी चार वाजता एकांकिकेला सुरुवात झाली. राजाराम बापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी इस्लामपूर यांनी तुम्ही ऑर नॉट टू मी, साई कला मंच इचलकरंजी यांची उत्कट आशेला क्षितिज नसतं या संघांचे सादरीकरण झाले. एकंदरीत पाहता यंदाच्या एकांकिकेने स्पर्धेची पातळी उंचावली असून एकापेक्षा एक वरचढ सादरीकरणाने प्रेक्षक वर्ग देखील सुखावला.
मानाच्या कॅपिटल वन चषकाचे अनावरण
कॅपिटल वन च्यावतीने आयोजित एकांकिका स्पर्धेच्या पहिल्या दिवशी मानाच्या कॅपिटल चषकाचे अनावरण स्पर्धेचे माननीय परीक्षक देविदास अमोनकर, राजीव जोशी, सुनील गुरव, संस्थेचे चेअरमन शिवाजी हांडे, व्हाईस चेअरमन शाम सुतार, संस्थेचे संचालक रामकुमार जोशी, शिवाजीराव अतिवाडकर, सदानंद पाटील, शरद पाटील, संजय चौगुले, भाग्यश्री जाधव, नंदा कांबळे यांच्या उपस्थितीत करण्यात आले.