बेळगाव (प्रतिनिधी) : मच्छे लक्ष्मीनगर येथे झालेल्या घरफोडी आणि चारचाकी वाहन चोरी प्रकरणी दोघांना अटक करण्यात बेळगाव ग्रामीण पोलिसांना यश आले आहे. कृष्णा उर्फ राजू अशोक रामण्णावर (वय २३, रा. बडाल अंकलगी, सध्या रा. नावगे) आणि नागराज उर्फ अप्पू संगप्पा बुदली (वय ३०, रा. रंगदोळी, बेळगाव) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकाच्या हद्दीतील लक्ष्मी नगर मच्छे येथे येथे दि. २ नोव्हेंबर २०२२ रोजी घरफोडी आणि चारचाकी वाहन चोरी प्रकरणी बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली होती. या तक्रारीची दखल घेऊन तपासाला गती देत ग्रामीण पोलिसांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण पोलीस विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त एस. व्ही. गिरीश, पोलीस निरीक्षक श्रीनिवास हंडा यांच्या नेतृत्वाखालील पथकाने मच्छे औद्योगिक विभाग परिसरात संशयास्पदरित्या आढळून आलेल्या दोन आरोपींना ताब्यात घेतले.
अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून १ चार चाकी ,२ दुचाकी, सोन्याचे दागिने, लॅपटॉप आणि टीव्ही असा एकूण ८,५०,००० रु. किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर आरोपींनी ग्रामीण पोलीस स्थानकाच्या हद्दीत ३, एपीएमसी पोलीस स्थानकाच्या हद्दीत १ आणि उद्यमबाग परिसरात एका घरी चोरी केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.
ही कारवाई केलेल्या पोलीस निरीक्षक श्रीनिवास हंडा आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे पोलीस आयुक्त आणि उपायुक्तांनी अभिनंदन केले आहे.