बेळगाव : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे नवनियुक्त अध्यक्ष गोपाळराव देसाई, कार्याध्यक्ष यशवंतराव बिर्जे व त्यांच्या सहकाऱ्यांनी शनिवारी बेळगाव जिल्हा मराठी पत्रकार संघ, बेळगाव वार्ता कार्यालयाला सदिच्छा भेट दिली.
प्रारंभी अध्यक्ष गोपाळराव देसाई यांच्या हस्ते मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
बेळगाव जिल्हा मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष कृष्णा शहापूरकर यांचे यावेळी शुभेच्छापर भाषण झाले. ते म्हणाले, खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या दोन्ही गटात एकी व्हावी अशी मराठी जनतेची इच्छा होती. त्यासाठी गेल्या काही दिवसांपासून प्रयत्न सुरू होते. या प्रयत्नांना यश आले व दोन्ही गट एकत्र झाले. ही सीमा प्रश्नाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण घटना आहे. गोपाळराव देसाई व त्यांच्या सहकाऱ्यांवर मराठी जनतेने विश्वास व्यक्त केला आहे. हा विश्वास ते निश्चितपणे सार्थ ठरवतील. सध्या सीमा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात आहे. यामुळे न्यायालयीन लढाई बरोबरच रस्त्यावरची लढाईही आपण लढली पाहिजे. त्यासाठी समिती बळकट होणे गरजेचे होते. खानापूर समितीने ऐक्य घडवून आदर्श निर्माण केला आहे. हा आदर्श घेऊन समितीच्या अन्य घटक शाखांनीही ऐक्य राखले पाहिजे ही काळाची गरज आहे.
समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई, कार्याध्यक्ष यशवंतराव बिर्जे तसेच ज्येष्ठ नेते प्रकाश चव्हाण यांचा यावेळी पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला.
बेळगाव वार्ताचे संपादक सुहास हुद्दार यांनी स्वागत केले व पत्रकार संघाचे कार्यवाह शेखर पाटील यांनी आभार मानले. पत्रकार संघाच्या कार्यालयात हा कार्यक्रम झाला.
यावेळी आबासाहेब दळवी, मुरलीधर पाटील, निरंजन सरदेसाई, राजाराम देसाई, अनिल पाटील, ब्रह्मानंद पाटील, संतोष पाटील आदी उपस्थित होते.