बेळगाव : श्रीराम सेना आणि हिंदुराष्ट्र सेनेचे जिल्हाध्यक्ष रवी कोकितकर यांच्यावर गोळीबार केल्याच्या प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. त्यांच्या बोलेरो कारमध्ये आणखी एक गोळी आढळून आल्याने हल्लेखोरांनी दोन गोळ्या झाडल्याचे स्पष्ट झाले आहे.
श्रीराम सेना आणि हिंदुराष्ट्र सेनेचे जिल्हाध्यक्ष रवी कोकितकर यांच्या बोलेरो कारवर हिंडलगा जेलजवळील स्पीडब्रेकरजवळ गोळीबार केल्याची घटना गेल्या आठवड्यात घडली होती. या घटनेने बेळगाव हादरले होते. या घटनेचे पर्यवसान जातीय संघर्षात होते की काय अशी भीती निर्माण झाली होती. मात्र बेळगाव पोलिसांनी तातडीने सूत्रे फिरवून तीन संशयितांना अटक करण्यात यश मिळवले होते. तसेच हा हल्ला पूर्व वैमनस्यातून आणि आर्थिक व्यवहारातून बदल्याची करण्यात आल्याचे जाहीर केले होते. त्यावेळी एकदाच फायरिंग झाल्याचा उल्लेख एफआयआरमध्ये केला होता. त्यानंतर आज पोलिसांनी जप्त केलेली बोलेरो उघडून पाहिली असता, त्यात आणखी एक पुंगळी आढळून आली. घटनेनंतर रवी कोकितकर यांनी दोन गोळ्या झाडल्याचे सांगूनही पोलिसांनी ऐकले नाही. त्यामुळे आता आणखी एक गोळी सापडल्यानंतर कोकितकर यांनी पोलिसांच्या निःपक्ष तपासावर साशंकता व्यक्त केली आहे. दोन गोळ्या झाडल्याचे सांगूनही पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचे त्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, त्यांच्या कुटुंबीयांनी कॅम्प पोलीस ठाण्याला भेट देऊन याबाबत माहिती घेतली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta