बेळगाव : येळ्ळूर भाजपा ग्रामपंचायत सदस्याच्या वतीने येळ्ळूर गावासाठी पी.डी.ओ. अरुण नायक हेच कायम रहावेत. यासाठी बेळगाव जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यनिर्वाहक अधिकारी दर्शन एच. व्ही. यांना बुधवार (ता. 18) रोजी निवेदन देण्यात आले. येळ्ळूर भाजपा ग्रामपंचायत सदस्यांच्या वतीने, तसेच गावातील काही सुज्ञ नागरिकांच्या वतीने हे निवेदन देण्यात आले.
या निवेदनात असे म्हटले आहे की, येळ्ळूर ग्रामपंचायतीचे पीडीओ अरुण नायक हे गेल्या साडेतीन वर्षापासून येळ्ळूरची धुरा चांगल्या पद्धतीने सांभाळत आहेत. त्यांनी येळ्ळूर ग्रामपंचायतीची सूत्रे हातात घेतल्यापासून येळ्ळूर ग्रामपंचायतीमधील व गावांमधील भ्रष्टाचाराला बऱ्याच प्रमाणात आळा बसलेला आहे. पीडीओ अरुण नायक यांच्या रूपाने एक प्रामाणिक व कर्तव्यदक्ष अधिकारी येळ्ळूर गावाला मिळालेले आहेत. 2019 च्या कोरोना सारख्या महामारीमध्ये त्यांनी 24 तास काम केले आहे. तसेच अतिवृष्टीमध्येही चांगल्या पद्धतीने त्यांनी काम केले आहे. त्यांनी कर्मचाऱ्यांच्या हिताचे काही निर्णय घेतले आहेत, के.ई.बी मध्ये येळ्ळूर ग्रामपंचायतीचे असलेले दहा लाख रुपये ग्रामपंचायतीला त्यांनी परत मिळवून दिले आहेत. सन 2018- 19 मध्ये ‘कर वसुली अभियान’ गावात राबवून पंचायतीची आर्थिक परिस्थिती त्यांनी सुधारली. त्याचप्रमाणे सन 2021- 22 मध्ये ही कर वसुली चांगल्या प्रकारे केली. त्यांच्याच कालावधीमध्ये गतवर्षी येळ्ळूर ग्रामपंचायतीला ॲक्टिव्ह ग्रामपंचायत हा पुरस्कारही मिळाला होता. गावातील नागरिकांना सहकार्याची वागणूक देऊन काम करण्याची वृत्ती त्यांची आहे. येळ्ळूर ग्रामपंचायत सुशोभीकरण व गावचा विकास करण्यासाठी सरकार दरबारी ते सतत पाठपुरावा करीत असतात. अशी अनेक गावच्या हिताची कामे करून येळ्ळूर गाव एक आदर्श व सुंदर गाव बनण्याचा त्यांचा सतत प्रयत्न असतो. म्हणून येळ्ळूर सारख्या मोठ्या गावाला पीडिओ अरुण नायक यांच्यासारख्याच प्रामाणिक व कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याची कायमस्वरूपी गरज आहे, आणि ते येळ्ळूर मध्येच कार्यरत राहावेत यासाठी आम्ही निवेदन देत आहोत. अशा प्रकारचे निवेदन येळ्ळूर भाजपा ग्रामपंचायत सदस्याच्या वतीने व गावातील काही सुज्ञ नागरिकांच्या वतीने जिल्हा पंचायततिचे सीईओ दर्शन एच. व्ही. यांना देण्यात आले. त्याचबरोबर सदर निवेदन तालुका पंचायत कार्यकारी अधिकाऱ्यांनाही देण्यात आले आहे.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य अरविंद पाटील, राजकुंवर पावले, शांता काकतकर, शशिकांत धूळजी, कल्लप्पा मेलगे, सुनील अरळीकट्टी, प्रदीप सुतार, राजू डोण्यान्नावर, रेणुका मेलगे, लक्ष्मी कणबरकर, शांता मासेकर, डॉ. तानाजी पावले, यल्लुप्पा पाटील, शिवाजी माणकोजी, नारायण काकतकर, अनंत पाटील आदी यावेळी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta