बेळगाव : विद्यार्थ्यांना चांगले जीवन जगायचे असेल आणि चांगले नागरिक बनायचे असेल तर शिक्षकांच्या मार्गदर्शनाची गरज असल्याचे मत प्रसिद्ध कन्नड चित्रपट अभिनेते चरणराज यांनी व्यक्त केले.
बेळगाव येथील भरतेश शिक्षण संस्थेच्या डी. वाय.चौगुले भरतेश हायस्कूलच्या हीरक महोत्सव कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते.
मुलांना बालवयातच दर्जेदार शिक्षण मिळाले तर ते चांगले नागरिक बनू शकतात. शिक्षण देणार्या शिक्षकाचे स्मरण कायम ठेवावे. जीवनात वाईट काय आणि चांगले काय, समाजात कसे वागावे, हे शिक्षक आपल्याला सांगतात. विद्यार्थ्यांचे जीवन घडवण्यात शिक्षकांची भूमिका महत्त्वाची असते, असेही ते म्हणाले.
समारंभाच्या अध्यक्षस्थानी भरतेश शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. जीनदत्त देसाई होते. ते यावेळी बोलताना म्हणाले की, भरतेश संस्थेच्या डी. वाय. चौगुले भरतेश हायस्कूलमध्ये आजपर्यंत हजारो विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतले आहे. यातील काही उच्च पदावर कार्यरत आहेत, तर काही परदेशात कार्यरत आहेत. भरतेशचे विद्यार्थी देशाच्या विविध भागात सेवा देत असून या विद्यार्थ्यांची सेवाभावना संस्थेला अभिमानास्पद आहे.
या कार्यक्रमात शैक्षणिक संस्थेचे संस्थापक आणि देणगीदार, वृषभ दोड्डन्नवर, सुरेंद्र कोडचवाड आणि माजी अध्यक्ष गोपाल जिनगौडा व पुष्पदंत दोड्डन्नवर यांचा सत्कार करण्यात आला. याच प्रसंगी शैक्षणिक संस्थेत 1962 पासून कार्यरत असलेल्या व सेवानिवृत्त झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांचा सत्कार करून त्यांच्या सेवेचे स्मरण करून गौरव करण्यात आला.
समारंभाच्या व्यासपीठावर भरतेश शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष राजीव दोड्डन्नवर, सचिव श्रीपाल खेमलापुरे, कोषाध्यक्ष भूषण मिर्जी, सह सचिव प्रकाश उपाध्ये, व्यवस्थापन मंडळाचे सदस्य विनोद दोड्डन्नवर, भरत पाटील, देवेंद्र देसाई, शरद पाटील, अशोक दानवडे, हिराचंदा कलमणी, डॉ. सावित्री दोड्डण्णावर वसंत कोडचवाड उपस्थित होते.
कार्यक्रमात प्राचार्य एस. एन. अक्की यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. विजय हन्नीकेरी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. संजय बिर्जे यांनी अभिवादन केले. विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.
Belgaum Varta Belgaum Varta