येळ्ळूर : ज्ञानवर्धिनी प्रतिष्ठान खानापूर यांच्यावतीने येळ्ळूरमधील श्री चांगळेश्वरी हायस्कूल येथे गेल्या दोन आठवड्यापासून आयोजित दहावी विद्यार्थ्यांसाठीच्या व्याख्यानमालेचा सांगता समारंभ शनिवार (ता. 21) रोजी संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री चांगळेश्वरी हायस्कूलचे मुख्याध्यापक अरुण धामणेकर हे होते. तर प्रमुख वक्ते म्हणून प्रा. सी. एम. गोरल हे होते. तर पाहुणे म्हणून ज्ञानवर्धिनी प्रतिष्ठानचे संचालक मनोहर होनगेकर, महाराष्ट्र हायस्कूलचे मुख्याध्यापक बबन कानशिडे, भावकेश्वरी माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक व्ही. एल. पाखरे, एम. डी पाटील, सौ. साधना हन्नूरकर, जे. पी. धामणेकर आदी उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयाचे मार्गदर्शन करण्यासाठी मराठी विद्यानिकेतनचे शिक्षक एस. एस. लाड उपस्थित होते.
यावेळी बोलताना प्रा. सी. एम. गोरल म्हणाले, दहावीच्या विद्यार्थ्यासाठी हे वर्ष फार महत्त्वाचे असून, विद्यार्थ्यांनी आळस झटकून अभ्यासाला लागले पाहिजे, त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी स्वतःमध्ये जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास व दुर्दृष्टी ठेवली पाहिजे. स्वतःवर विश्वास ठेवून अभ्यासाला लागले पाहिजे. कोणतेही काम करीत असताना कामावर निष्ठा असणे खूप गरजेचे आहे, त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी आलेल्या संधीचे सोने ही करायला शिकले पाहिजे, त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी पालक व गुरुजनांच्या अज्ञांचं पालन केले पाहिजे, अभ्यास करीत असताना टीव्ही आणि मोबाईल पासून स्वतःला दूर ठेवले पाहिजे. फक्त अभ्यासाचीच जबाबदारी विद्यार्थ्यांनी स्वीकारावी स्वीकारावी, इतर बाबीकडे लक्ष न देता व्यवस्थितरीत्या अभ्यास करावा. त्यांनी विद्यार्थ्यांना संधीचे सोने कसे करावे, विद्यार्थ्यांनी अभ्यास निष्ठापूर्वक कसा करावा व आपण संकटावर कशा पद्धतीने मात करू शकतो हे उदाहरणासह विद्यार्थ्यांना पटवून दिले. यावेळी ज्ञानवर्धिनी प्रतिष्ठानचे संचालक मनोहर होनगेकर यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. मुख्याध्यापक अरुण धामणेकर यांनी प्रास्ताविक करून उपस्थिताचे स्वागत केले. यानंतर दहावीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयाचे तज्ञ शिक्षक एस. एस लाड यांनी मार्गदर्शन केले. यावेळी सौ. नाईक, श्री. बोकडेकर हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ए. बी. कांबळे यांनी केले तर आभार महाराष्ट्र हायस्कूलचे मुख्याध्यापक बी. पी. कानशिडे यांनी मानले.
Belgaum Varta Belgaum Varta