


बेळगाव : बेळगाव तालुक्यात नियोजित रिंगरोड व नवीन रेल्वे लाईन हे शेतकऱ्याला देशोधडीला लावणारे आहेत. हे दोन्ही रस्ते सरकारने रद्द करावेत व शेतकऱ्यांना दिलासा दावा यासाठी तालुक्यातील शेतकरी सरकारकडे मागणी करत आहोत. याकरिता चाबूक मोर्चा, जनआक्रोश आंदोलन हे करत आहोत. परंतु सरकारने याची दखल न घेतल्यामुळे आता आम्हाला रस्तारोको आंदोलन छेडण्याची वेळ आली आहे, तेव्हा सरकारने शेतकऱ्यांच्या मानसिकतेचा विचार करून हे दोन्ही रस्ते रद्द करावेत. अन्यथा त्यापेक्षाही तीव्र आंदोलन हाती घेण्यात येईल व कोणत्याही परिस्थितीत रिंगरोड रद्द करण्यात येईल, असा इशारा माजी आमदार मनोहर किणेकर यांनी दिला.
सोमवार दिनांक 23 जानेवारी रोजी झाडशहापूर येथे बेळगाव तालुक्यातील समस्त शेतकरी व महाराष्ट्र एकीकरण समिती यांच्यावतीने रास्तारोको आंदोलन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते.
झाडशहापूर येथे सकारी 11 वाजता महामार्गावर शेतकऱ्यांनी आपली बैलजोड्या, बैलगाडी, ट्रॅक्टर, बैल, म्हशी, गाई, शेतकरी वर्ग, विद्यार्थी वर्ग महामार्गावर नियोजित आंदोलनस्थळी येऊन आंदोलनाला सुरुवात झाली. “रद्द करा रद्द करा रिंगरोड रद्द करा, रद्द करा रद्द करा, नवीन रेल्वे लाईन रद्द करा, जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची,” अशा अनेक घोषणांनी परिसर दुमदुमला होता. या रस्तारोको वेळी तालुक्यातील अनेक आपले विचार व्यक्त केले, यावेळी मनोज पावशे, परशुराम कोलकार, भागोजी पाटील, मनोहर संताजी, डॉ नितीन राजवळकर, पुंडलिक पावशे, ऍड. सुधीर चव्हाण, रामचंद्र मोदगेकर, सरस्वती पाटील, कमल मनोळकर, प्रकाश मरगाळे, माजी महापौर शिवाजी सुंठकर, दत्ता उघाडे, आदींनी रिंगरोड व नवीन रेल्वे मार्ग रद्द झाला तरच शेतकऱ्यांचे हिताचे ठरेल, असे आपले विचार व्यक्त केले.
आंदोलनस्थळी महामार्ग खात्याचे अधिकारी अशोक हन्निकेरी यांना शेतकऱ्यांच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी माजी आमदार मनोहर किणेकर, माजी महापौर शिवाजी सुंठकर, प्रकाश मरगाळे, रमाकांत कोंडूस्कर, रमेश गोरल, आर. एम. चौगुले, ऍड. सुधीर चव्हाण, सरस्वती पाटील, आर. आय. पाटील, महेश जुवेकर, आर. के. पाटील, बाळू बिरजे, एस. एल. चौगुले, रामचंद्र मोदगेकर, ऍड. श्याम पाटील, ऍड. प्रसाद सडेकर, प्रेमा मोरे, कमळ मनोळकर, निरा काकतकर, प्रेमा जाधव, मनोज पावशे, पुंडलिक पावशे, भागोजी पाटील, नाना पाटील अनिल पाटील, मनोहर जायाणाचे व तालुक्यातील शेतकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta