बेळगाव : बेळगावातील प्रमुख चौक असलेल्या धर्मवीर संभाजी महाराज चौकातील धर्मवीर संभाजी महाराजांच्या नूतनीकरण व सुशोभीकरण केलेल्या पुतळा व परिसराचा लोकार्पण सोहळा उद्या, शनिवारी सायंकाळी आयोजित केल्याची माहिती आ. अनिल बेनके यांनी दिली.
बेळगावात प्रसारमाध्यमांशी बोलताना आ. अनिल बेनके म्हणाले, उद्या छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन आहे. त्यानिमित्त उद्या सायंकाळी ६ ते ८च्या दरम्यान पुतळा व परिसराचा भव्य लोकार्पण सोहळा होणार आहे. केंद्रीय माहिती आयुक्त आणि ग्वाल्हेरच्या सरदार घराण्यातील माहूरकर यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्याशिवाय बेंगळूरच्या गोसावी मठाचे मराठा समाजाचे श्री श्री मंजुनाथ भारती स्वामीजी, खा. मंगल अंगडी, आ. अभय पाटील, माजी आ. संजय पाटील, निवृत्त मेजर जनरल देसाई आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. राज्यस्तरीय नेत्यांनाही निमंत्रित करण्यात आले आहे. मात्र उद्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा बेळगाव दौरा असल्याने वेळेची उपलब्धी पाहून येण्याचा प्रयत्न करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. भव्यदिव्य पद्धतीने हा सोहळा पार पाडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. कोल्हापूर येथील मर्दानी खेळांचे पथक, सुमारे १५ झांजपथके, घोडे आदींच्या सहभागाने शानदार समारंभात पुतळा परिसराचे लोकार्पण करण्यात येणार आहे.
आ. बेनके पुढे म्हणाले, धर्मवीर संभाजी महाराज यांचा बलिदान मास लवकरच असल्याच्या पार्श्वभूमीवर लोकार्पण सोहळा करण्यात येत आहे. त्यासाठी संबंधित अभियंत्यांनी रात्रंदिवस परिश्रम करून वेगाने दर्जेदार पद्धतीने सुशोभीकरणाचे काम पूर्ण केले आहे. पुतळ्याची रंगरंगोटी करण्यात आली आहे. त्याच्यामागे मुंबईहून मागवलेले भवानी मातेचे भव्य छायाचित्र लावण्यात आले आहे. धर्मवीर संभाजी महाराज चौक हा बेळगावातील एक मध्यवर्ती भागातील प्रमुख चौक असल्याने धर्मवीर संभाजी महाराजयांच्या लौकिकाला साजेलसे आकर्षक व भव्य पद्धतीने काम पार पाडण्यात आले आहे. यासाठी सुमारे ४० लाखांचा खर्च आला आहे. बेळगाव महानगर पालिका आणि बेळगाव नगरविकास प्राधिकरणाच्या अनुदानातून यासाठी निधी खर्च करण्यात आला आहे. पुतळा परिसरातील वापराविना असलेले स्वच्छतागृह हटवण्यात येईल. तसेच तेथे स्वच्छता राखण्यासाठी कार्यकर्ते खडा पहारा देणार आहेत, असे आ. अनिल बेनके यांनी सांगितले.
Belgaum Varta Belgaum Varta