
बेळगाव : सीमालढा हा मराठी अस्मितेचा, मराठी भाषेचा, मराठी संस्कृतीचा आहे. तेव्हा आम्हाला न्याय मिळेपर्यंत लढणे हे आमचे कर्तव्य आहे. सीमाभागातील महिलांना मिक्सर, ताट, कुकर, साडी देऊन दिशाभूल करण्याचा जो प्रयत्न राष्ट्रीय पक्षाने चालवला आहे तो येणाऱ्या निवडणुकीत महिलांनी हाणून पाडला पाहिजे व महाराष्ट्र एकीकरण समितीचे सर्व उमेदवार विजयी करून राष्ट्रीय पक्षांना त्यांची जागा दाखवून दिली पाहिजे, असे विचार ऍड. तृप्ती सडेकर यांनी व्यक्त केले.
बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने हळदीकुंकू समारंभाचे आयोजन मराठा मंदिर येथे रविवार दि. 30 रोजी करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी जिल्हा पंचायत सदस्या सरस्वती पाटील होत्या.
ऍड. तृप्ती सडेकर पुढे म्हणाल्या की, देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भाषावर प्रांतरचना करून प्रत्येक भाषिकाना त्यांच्या त्यांच्या मातृभाषेचे राज्य मिळाले. परंतु सीमाभागातील मराठी भाषिकांना त्यांच्या माय मराठी राज्यात जाण्याऐवजी तात्कालीन कन्नड भाषिक म्हैसूर राज्यात डांबण्यात आले, तेव्हापासून सीमाभागातील मराठी भाषिक जनता लोकशाहीच्या मार्गाने लढत आहे. सत्याग्रह, निवेदने, धरणे आंदोलन, साराबंदी, निवडणुका जिंकून राज्य सरकार व केंद्र सरकारला महाराष्ट्रात जाण्यासाठी आपला निश्चय दाखवला आहे. परंतु केंद्र सरकारने याची दखल न घेतल्यामुळे 2004 साली महाराष्ट्र सरकारच्या सहमतीने हा लढा प्रश्न सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आला आहे. सुप्रीम कोर्टात दाखल केल्यापासूनही कायदेशीर लढाई बरोबरच रस्त्यावरची लढाई सीमाभागातील मराठी भाषिक लढत आहेत. मराठी भाषिकांतील दुहीमुळे गेल्या 15 वर्षात राष्ट्रीय पक्षांना याचा फायदा मिळाला आहे. तेव्हा आता समितीमध्ये एकी झाली असून येणाऱ्या निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पाठीशी राहणे हे सर्व मराठी भाषिक जनतेचे कर्तव्य आहे, तरच आपण जिजाऊच्या, सावित्रीच्या लेकीचा वारसा जपत आहोत हे सिद्ध होईल. तेव्हा सर्व मराठी भाषिकांनी याचे अनुकरण केले पाहिजे व राष्ट्रीय पक्षांना त्यांची जागा दाखवून दिली पाहिजे, असे त्या म्हणाल्या.
तालुका पंचायतच्या माजी सदस्य कमल मन्नोळकर यांनी प्रास्ताविक केले. प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या शिक्षिका शितल बडमंजी, ऍड. तृप्ती सडेकर, शाहिरी वैष्णवी मंगनाईक, शिक्षिका कमळ हलगेकर यांचा शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी वैष्णवी मंगनाईक या येळ्ळूरच्या विद्यार्थिनीने पहाडी आवाजात पोवाडा सादर करून सर्वांचेच लक्ष वेधले.
यावेळी शितल बडमंजी म्हणाल्या, हळदी कुंकू समारंभ हिंदू संस्कृतीत महत्त्वाचा मानला जातो, सूर्य जेव्हा मकर राशित प्रवेश करतो तेव्हा आपण मकर संक्रांत म्हणतो. हा सूर्य उत्तरच्या दिशेकडे जात असताना थंडी कमी होऊन उष्णतेला थोडी थोडी सुरुवात होते. तसेच या तिळगुळच्या दिवशी जीवनातील अनेक कटुता आपण संपवून सर्वांच्या तोंडामध्ये तीळ आणि गुळ भरून एक नव्या पर्वाची सुरुवात आपण या दिवसापासून करतो. महिलांनी आता काळानुरूप जगले पाहिजे. महिला सक्षमीकरणात महिलांचे मोठे योगदान असले पाहिजे. त्या प्रत्येक क्षेत्रात महिला, पुरुषाच्या बरोबरीने कार्य करत आहेत. तेव्हा आपण समाजातील प्रत्येक क्षेत्रात चांगले कार्य करून समाजाला दिशा देण्याचे कार्य केलं पाहिजे. सीमाभागातील मराठी भाषेवर जो अन्याय होत आहे त्याला वाचा फोडण्याचे काम महाराष्ट्र एकीकरण समिती करत आहे. तेव्हा या लढ्यात आता महिलांनीही सक्रीय सहभाग दर्शविला पाहिजे आणि दर्शवतील असा विश्वास आम्ही आज व्यक्त करतो, असे त्या म्हणाल्या.
यावेळी मनोहर किणेकर म्हणाले की, बेळगाव तालुक्यातील मराठी भाषिकांना संपविण्यासाठी तालुक्यात सरकारच्या वतीने रिंगरोड सारखा प्रस्ताव आणून शेतकऱ्यांना देशीधडीला लावण्याचे कार्य सुरू करण्यात आले आहे. महाराष्ट्र एकीकरण समिती या रिंगरोडला विरोध करून न्यायालयीन लढाई लढत आहे. या लढ्याबरोबर जनआक्रोश आंदोलन, रास्तारोका आंदोलन, चाबूक मोर्चा, तसेच अनेक प्रकारचे आंदोलन हाती घेऊन हा रिंगरोड रद्द केल्याशिवाय राहणार नाही. शेतकऱ्यांच्या पाठीशी महाराष्ट्र एकीकरण समिती ही एकमेव संघटना आहे. बेळगाव येथे झालेल्या अधिवेशनात कुठल्याही राष्ट्रीय पक्षाच्या आमदाराने विधानसभेत या रिंगरोडबद्दल एकही शब्द उच्चारला नाही. तेव्हा मराठी जनतेने राष्ट्रीय पक्षाचे धोरण समजून घेतले पाहिजे व आपली जमीन वाचवली पाहिजे तेव्हा सर्व मराठी भाषिकांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पाठीशी राहणं गरजेचं आहे, असे विचार व्यक्त केले.
अध्यक्षीय भाषण माजी जिल्हा पंचायत सदस्या सरस्वती पाटील यांनी केले. युवा आघाडीचे चिटणीस मनोहर संताजी यांनी आभार व्यक्त केले.
Belgaum Varta Belgaum Varta