बेळगाव : रिंगरोडसाठी मुतगा परिसरातील शेतकऱ्यांची एक इंच ही जमीन आम्ही देणार नाही, प्रसंगी कोणतेही आंदोलन करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत, येत्या 6 फेब्रुवारीला मुतगा गावामध्ये रिंगरोड रद्द करण्यासाठी रास्ता रोको आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या आंदोलनामध्ये मुतगा परिसरातील सर्व गावातील शेतकरी बंधुनो आपल्या कुटुंबासह, जनावरे, बैलगाडी, ट्रॅक्टरसह रास्ता रोको आंदोलनामध्ये सहभागी होऊन हा रास्तारोको आंदोलन यशस्वी करावयाचे आहे, असे आवाहन माजी आमदार मनोहर किणेकर यांनी मुतगा येथे केले.
बुधवार दिनांक 1 फेब्रुवारी रोजी मुलगा येथे रास्ता रोको आंदोलनासंदर्भात बैठकीच्या आयोजन करण्यात आले होते. या बैठकीचे अध्यक्षस्थानी माजी तालुका पंचायत सदस्य शामराव पाटील होते.
नारायण कणबरकर यांनी प्रास्ताविक करून उपस्थित त्यांचे स्वागत केले. या बैठकीला उद्देशून बोलताना माजी तालुका पंचायत सदस्य सुनील अष्टेकर म्हणाले की, मुलगा परिसरामध्ये सरकारने याआधी बेळगाव बागलकोट रस्त्याची रुंदीकरण करतेवेळी शेतकऱ्यांची जमीन घेतली आहे, तसेच सांबरा विमानतळाचे विस्तारीकरण करतेवेळी परिसरातील अनेक शेतकऱ्यांचे जमिनीचे भूसंपादन करण्यात आले आहे. यामुळे येथील शेतकरी आता अल्पभूधारक झाला आहे, यामुळे सरकारने या परिसरात रिंगरोडसारखे प्रस्ताव आणून शेतकऱ्यांना देशोधडी लावण्याचे काम करू नये. शहरातील वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी उड्डाणपूलचा पर्याय सरकारने स्वीकारावा व हा रिंग रोडचा प्रस्ताव रद्द करावा अन्यथा आम्ही अनेक आंदोलन करून सरकारला हा प्रस्ताव रद्द करण्यासाठी भाग पाडू. तेव्हा शेतकऱ्यांनी बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीने जे जी आंदोलने घेतली जाईल त्यामध्ये तुम्ही मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन केले. यावेळी माजी महापौर शिवाजी सुंठकर, ऍड. सुधीर चव्हाण, आर. एम. चौगुले, भागोजी पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य रामचंद्र मोदगेकर, आर. आय. पाटील, सातेरी पाटील, भालचंद्र पाटील, आदींनी आपले विचार व्यक्त केले. यावेळी मुतगा परिसरातील अनेक शेतकरी उपस्थित होते. भाऊ जाधव यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta