बेळगाव : आध्यात्मिक गुरुजी श्री श्री रविशंकर यांचा सोमवारी (ता. ६) सायंकाळी ५ वाजता क्लब रोडवरील, सीपीएड मैदानावर आध्यात्मिक कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती कार्यक्रमाचे समन्वयक महेश केरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. आर्ट ऑफ लिव्हिंगतर्फे हा कार्यक्रम होणार आहे. १४ वर्षांनंतर बेळगावला भेट देत असलेले जागतिक आध्यात्मिक गुरुदेव श्री श्री रविशंकर यांच्या भव्य स्वागतासाठी बेळगावनगरी सज्ज झाली आहे.
सोमवारच्या कार्यक्रमात विविध धार्मिक विधी, एक महासत्संग,
गुरुदेवांसोबत एक मोठी सार्वजनिक सभा यांचा समावेश असेल. यात ते हजारो भक्तांना ध्यान,नामजप आणि गाण्यात मार्गदर्शन करतील.
या सोहळ्याला आजूबाजूच्या गावातील लोक मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची शक्यता आहे. रुद्र पूजन, रुद्र रूपात शिवाची पूजा करण्याचा पारंपरिक वैदिक सोहळा सत्संगाच्या आधी होणार आहे. कपिलेश्वर मंदिर ट्रस्टच्या सदस्यांच्या निमंत्रणावरून गुरुदेव कपिलेश्वर मंदिरालाही भेट देणार आहेत. बेळगाव आणि आसपासच्या गावांमधील आर्ट ऑफ लिव्हिंगचे स्वयंसेवक संपूर्ण शहरात आनंद आणि अध्यात्माच्या लाटा वाढविण्यासाठी अथक परिश्रम करत आहेत. हर घर ध्यान, आझादी का अमृत महोत्सव अभियानांतर्गत शहरातील शाळांमध्ये मोफत ध्यान सत्र आयोजित केले जात आहेत, असेही श्री. केरकर म्हणाले. आनंदी, हिंसामुक्त आणि तणावमुक्त समाज निर्माण करण्यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेने कारागृह, गाव, शाळा आणि शहरांमध्ये नागरिकांसाठी आर्ट ऑफ लिव्हिंगद्वारे चालविल्या जाणाऱ्या मोफत शाळांनी दुर्गम खेड्यांमध्ये पहिल्या पिढीतील ८०,००० विद्यार्थ्यांना दर्जेदार सर्वसमावेशक शिक्षण दिले आहे. कर्नाटकात, उदयपूर, बंगळूर येथे २,३०० विद्यार्थी मोफत शिक्षण घेत आहेत. कर्नाटकातील सहा मध्यवर्ती कारागृह, बेळगाव, धारवाड, विजापूर, बळ्ळारी, गुलबर्गा आणि म्हैसूर येथेही आर्ट ऑफ लिव्हिंगतर्फे कार्यक्रम राबविले आहेत, अशी माहितीही श्री. केरकर यांनी दिली. पत्रकार परिषदेला डॉ. दीपाली पाटील, रवी हिरेमठ, हर्षद पत्रावळी, प्रवीण शेरी आदी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta