बेळगाव : अक्षता कामतीने वेटलिफ्टिंग स्पर्धेमध्ये अनेक सुवर्णपदके जिंकून ग्रामीण भागातील तरुणींना एक आदर्श ठरली आहे. अक्षता कामतीने आता ऑलम्पिकमध्ये भाग घेऊन तेथील सुवर्णपदकावर लक्ष ठेवून आपली वाटचाल सुरू केली पाहिजे. शालेय विद्यार्थ्यांनी अक्षता कामतीचा आदर्श समोर ठेवून आपल्या आवडत्या खेळातही अशी दैदिप्यमान कामगिरी करावी व आपल्या गावाचे नाव देशांमध्ये मोठे करावे, असे उद्गार मनोहर संताजी यांनी केले.
शारदा माध्यमिक शाळेमध्ये वेटलिफ्टिंगपटू अक्षता कामती हिचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आदर्श एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष विजय लोहार होते. शुक्रवार दिनांक 3 रोजी हा कार्यक्रम उत्साहात करण्यात आला.
सहशिक्षक शिवाजी बिळगोजी यांनी प्रास्ताविक केले. पाहुण्यांचा परिचय मुख्याध्यापक व्ही. आर. घाडी यांनी केले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामपंचायत अध्यक्ष सदानंद बिळगोजी, मराठी शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष मनोहर संताजी, नागाप्पा बिळगोजी, निवृत्त शिक्षक गुंडूं बिळगोजी, आदर्श एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त तुकाराम सामजी, सुरेश बिळगोजी, अर्जुन लोहार, कृष्णा चौगुले, बसवंत कामती, नारायण चौगुले उपस्थित होते. या सर्वांचे शारदा माध्यमिक शाळेच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. वेटलिफ्टिंगपट्टू अक्षता कामती हिचा सत्कार सुरेश बेळगोजी, सदानंद बिळगोजी, मनोहर संताजी यांच्या हस्ते शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला.
यावेळी सदानंद बिळगोजी म्हणाले की, अक्षता कामतीने एक चांगले ध्येय समोर ठेवून सातत्य व चिकाटीच्या जोरावर वेटलिफ्टिंग क्रीडा स्पर्धेत अनेक राष्ट्रीय स्तरावरची नऊ सुवर्णपदके मिळवले आहेत. यामुळे शारदा माध्यमिक शाळेतील विद्यार्थिनींनी याचा आदर्श समोर ठेवून तिच्यापेक्षाही मोठी कामगिरी करावी, तरच या सत्कार समारंभाचे फलित साध्य होणार आहे. यावेळी क्रीडा शिक्षक राजू पाटील यांनी आपले विचार व्यक्त केले. शिवाजी बिळगोजी यांनी सूत्रसंचालन केले. शेवटी सुजाता अळवाडकर यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta