
बेळगाव : नियोजित रिंगरोड रद्द व्हावा यासाठी आज बेळगाव- बागलकोट रस्त्यावर रस्ता रोको आंदोलन छेडण्यात आला. हा रिंगरोड म्हणजे तालुक्यातील शेतकऱ्याला गळफास रोड आहे. जेव्हापासून रिंगरोडचे नियोजन सरकारने घातले आहे, तेव्हापासून आम्ही हा रिंगरोड रद्द व्हावा म्हणून चाबूक मोर्चा काढून शेतकऱ्यांनी आपला विरोध दर्शविला आहे. चाबूक मोर्चामुळे आपण सरकारला इशारा दिला होता की नजीकच्या काळात हा रिंगरोडचा प्रस्ताव सरकारने रद्द केला नाही, तर प्रसंगी आम्ही हातात चाबूक घेऊन सरकारवर चालून जाण्याचा इशारा दिला आहे ती वेळ आता सरकारने आमच्यावर आणू नये यासाठी आपण जनआक्रोश आंदोलन, रास्तारोको आंदोलन करत आहोत. तरीसुद्धा या सरकारला अजून जाग आली नाही येत्या काही काळात शेतकऱ्यांची मानसिकता लक्षात घेऊन सरकारने हा रिंगरोडचा प्रस्ताव रद्द केला नाही, तर शेतकरी हातात चाबूक घेऊन प्रसंगी चाबूक मारू आंदोलन छेडण्याचा प्रसंग उद्भवू नये तेव्हा सरकारने या प्रसंगाची जाणीव करून घेऊन हा रिंग रोड लवकर रद्द करावा तरच शेतकरी स्वस्त बसेल नाहीतर उग्र आंदोलन या पुढील काळातील शेतकरी करतील, असा इशारा माजी आमदार मनोहर किणेकर यांनी केला.
सोमवार दिनांक 6 फेब्रुवारी रोजी मुतगा गावांमध्ये बेळगाव- बागलकोट महामार्गावर बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने रास्तारोको आंदोलन छेडण्यात आले होते.
मुतगा गावांमध्ये सदर आंदोलन होणार आहे म्हणून बेळगाव तालुक्यातील अनेक शेतकरी बांधव सकाळी 11 वाजता नियोजित स्थळी आले होते. मुतगा येथील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे पूजन माजी तालुका पंचायत सदस्य सुनील अष्टेकर व माजी महापौर शिवाजी सुंठकर यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर राष्ट्रीय महामार्गावर शेतकऱ्यांनी बसून आंदोलनाला सुरुवात केली.
यावेळी शेतकऱ्यांनी “रद्द करा रद्द करा, रिंग रोड रद्द करा” “जय जवान जय किसान” अशा घोषणा दिल्या.
यावेळी बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे माजी महापौर शिवाजी सुंठकर, भागोजी पाटील, रामचंद्र मोदगेकर, आर. एम. चौगुले, रमाकांत कोंडूस्कर, ऍड. सुधीर चव्हाण, ऍड. श्याम पाटील, सुनील अष्टेकर, सरस्वती पाटील आदींनी आपले विचार व्यक्त केले. या रास्तारोको आंदोलनामध्ये बेळगाव तालुक्यातील अनेक शेतकरी, महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता, तसेच मुतगा येथील प्राथमिक व माध्यमिक शाळेचे विद्यार्थी उपस्थित होते. रास्ता रोको आंदोलन यशस्वी झाल्यामुळे महामार्गावर दोन्ही बाजूला अनेक वाहने थांबून होती. रास्तारोको आंदोलनावेळी शेतकऱ्यांचे निवेदन स्वीकारण्यासाठी प्रांताधिकारी बलराज चव्हाण यांनी हे उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या वतीने त्यांना सदर रिंगरोड रद्द व्हावा म्हणून निवेदन माजी आमदार मनोहर किणेकर व अनेक नेत्यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी पोलीस फौजफाटा मोठ्या संख्येने उपस्थित होता.
Belgaum Varta Belgaum Varta