येळ्ळूर : येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संघाच्या वतीने कै. सुमित्रा यल्लोजीराव मेणसे यांच्या स्मरणार्थ आयोजित कथाकथन स्पर्धेत कुमारी समृद्धी गणपती पाटील व कुमारी अनुजा दत्तात्रय लोहार यांनी प्रथम क्रमांक मिळविले. येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संघाच्या वतीने शुक्रवार (ता 10) रोजी श्री शिवाजी विद्यालयाच्या सभागृहात सदर कथाकथन स्पर्धा घेण्यात आल्या. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री शिवाजी विद्यालयाचे मुख्याध्यापक एम. बी. बाचीकर हे होते. तर व्यासपीठावर साहित्य संघाचे अध्यक्ष परशराम मोटराचे, माजी ग्रामपंचायत सदस्य रमेश धामणेकर, सचिव डॉ.
तानाजी पावले, कार्याध्यक्ष प्रा. सी. एम. गोरल, उपखजिनदार कृष्णा टक्केकर, शिक्षक संजय मजूकर, शिक्षिका विद्या पाटील आदी उपस्थित होते. प्रारंभी श्री शिवाजी विद्यालयाच्या मुलींच्या ईशस्तवनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्याध्यक्ष प्रा. सी. एम. गोरल यांनी कथाकथन आयोजित करण्याचा उद्देश स्पष्ट केला. त्यानंतर उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते सरस्वती प्रतिमेचे पूजन व सावित्रीबाई फुले प्रतिमेचे पूजन करण्यात आले. मुख्याध्यापक एम. बी. बाचीकर यांनी रोपट्याला पाणी घालून कथाकथन स्पर्धेला सुरुवात केली. प्रास्ताविक साहित्य संघाचे अध्यक्ष परशराम मोटरचे यांनी केले व गेल्या सतरा वर्षांपासून सुरू असलेल्या साहित्य संमेलनाचा आढावा घेतला व हा उपक्रम सातत्याने आम्ही या पुढेही सुरू ठेवू असे सांगितले. यानंतर साहित्य संघाच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. मुख्याध्यापक एम. बी. बाचीकर यांनी साहित्य संघाच्या उपक्रमाचे कौतुक केले व अशा स्पर्धांचे आयोजन करणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. या स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या वकृत्व गुणाना व कलागुणांना वाव मिळतो व विद्यार्थ्यांमध्ये सुप्त गुण वाढीस लागतात असे त्यांनी सांगितले. परीक्षक संजय मजूकर यांनी स्पर्धेचे नियम व अटी स्पर्धकांना सांगितल्या. परीक्षक म्हणून शिक्षक संजय मजूकर व शिक्षिका विद्या पाटील यांनी काम पाहिले.
स्पर्धेमधील विजेत्यांची नावे अशी- माध्यमिक गट – प्रथम क्रमांक कुमारी समृद्धी गणपती पाटील (बालिका आदर्श विद्या मंदिर टिळकवाडी) द्वितीय क्रमांक- कुमारी मनाली सुभाष बराटे (मराठी विद्यानिकेतन बेळगाव) तृतीय क्रमांक- कुमारी प्राप्ती विश्वनाथ पाटील (श्री शिवाजी विद्यालय येळ्ळूर)
खुला गट
प्रथम क्रमांक- कुमारी अनुजा दत्तात्रय लोहार (व्ही पी देसाई जुनिअर कॉलेज कोवाड), द्वितीय क्रमांक- डॉ. चंद्रकांत डावरे (निपाणी)
यावेळी सुभाष मजूकर, एच. एस. लोकळूचे, एस. पी. मेलगे, एम. बी. पंथर, रेखा पाटील, एस. वाय. धामणेकर, निर्मला कंग्राळकर, महादेव घाडी यांच्यासह श्री शिवाजी विद्यालयाचे विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. सी. एम. गोरल यांनी केले तर आभार शिक्षक एच. एस. लोकळूचे यांनी मानले.
Belgaum Varta Belgaum Varta