बेळगाव : 19 फेब्रुवारी रोजी शहर महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक रंगुबाई पॅलेस येथे पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी शहर समिती अध्यक्ष दीपक दळवी हे होते. 28 फेब्रुवारी रोजी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने “चलो मुंबई”नारा दिला आहे निद्रिस्त महाराष्ट्र सरकारला जागे करण्यासाठी महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनावेळी सीमावासीयांचे हे आंदोलन होणार आहे. यावेळी बहुसंख्य कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून सदर आंदोलन यशस्वी करण्याचा निर्धार यावेळी बैठकीत करण्यात आला.
धरणे आंदोलनात सहभागी होणाऱ्या कार्यकर्त्यांनी लवकरात लवकर आपापली नावे नोंदवावीत व जे कार्यकर्ते खाजगी वाहनाने जाणार आहेत त्यांनी आपली नावे व वाहन क्रमांक शहर समितीच्या कार्यालयात नोंदवावीत, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
आगामी विधानसभा निवडणुकीत शहर समितीकडून उमेदवार निवडीसंदर्भात विचार करण्यात यावा अशी मागणीही यावेळी कार्यकर्त्यांकडून करण्यात आली.
मुंबई येथील आंदोलनात सहभागी होणाऱ्या मराठी भाषिकांच्या जेवणाची आणि राहण्याची सोय महाराष्ट्रातील नेतेमंडळी करणार असून या पार्श्वभूमीवर नियोजन करण्यासाठी कार्यकर्त्यांनी लवकरात लवकर आपली नावे समिती कार्यकारिणीकडे नोंदविण्याचे आवाहन बैठकीत करण्यात आले. यावेळी दिवंगत समिती कार्यकर्त्यांना आणि मान्यवरांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
यावेळी समिती नेते रमाकांत कोंडुसकर, महादेव पाटील, विश्वनाथ सूर्यवंशी, सतीश पाटील, मदन बामणे, सागर पाटील गुणवंत पाटील, गजानन पाटील, अभिजित मजूकर, अमित देसाई, सौ. शिवानी पाटील आदींसह अनेक कार्यकर्त्यांनी २८ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या “चलो मुंबई” आंदोलनासंदर्भात याचप्रमाणे आगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भात महाराष्ट्र एकीकरण समितीने रूपरेषा ठरविण्याबाबत यावेळी आपली मते मांडली.
आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीने लवकरात लवकर उमेदवार निश्चित करून प्रचाराला सुरुवात करावी, एकच उमेदवार जाहीर होईल या दृष्टिकोनातून प्रयत्न करावेत तसेच मतांची विभागणी होणार नाही याकडे समिती नेत्यांनी लक्ष पुरवावे अशा महत्वपूर्ण मागण्यांचे मुद्दे उचलून धरत अनेक कार्यकर्त्यांनी आपले प्रतिक्रिया व्यक्त केली. तसेच चलो मुंबई मोर्चा यशस्वी करण्याचा निर्धारही करण्यात आला.
बैठकीत इतर संघटना आणि पक्षातून आलेल्या मराठी भाषिकांना शहर समितीत सामावून घेण्याचा निर्णय घेण्यात आला त्या अनुषंगाने शहर समितीने 200 जणांच्या नवीन कार्यकारिणीची नावे जाहीर करण्यात आली या शिवाय इतर संघटनेतून समितीत सामावून घेण्याचा निर्णय झाला.