समिती नेते रमाकांत कोंडुस्कर यांना पाठिंबा
बेळगाव (प्रतिनिधी) : मराठी भाषा, मराठी संस्कृती, मराठी अस्मिता आणि मराठी स्वाभिमान जपण्यासाठी काढण्यात आलेल्या आजच्या “शिवसन्मान” पदयात्रेच्या तिसऱ्या दिवशी पिरनवाडी ते भवानीनगर या भागात भगव्याचा जागर करण्यात आला.
पिरनवाडी येथून शिवनावाचा जयघोष करीत शिवसन्मान पदयात्रेला सुरुवात करण्यात आली. ब्रह्मनगर, खादरवाडी, राजारामनगर या भागात पदयात्रा झाल्यानंतर मजगाव, रोहिदासनगर, चन्नम्मा नगर, पार्वतीनगर यामार्गे भवानी नगर परिसरात आजच्या पदयात्रेची सांगता झाली.
राजारामनगर आणि उद्यमबाग परिसरात रमाकांत कोंडुस्कर यांनी कष्टकरी बांधवांशी संवाद साधला. पदयात्रेदरम्यान शिवभक्तांनी ठिकठिकाणी भगव्यावर पुष्पवृष्टी करून भगव्याचे पूजन केले. तसेच शिवनामाचा जयघोष करण्यात आला.
भवानीनगर भागातील समाजसेवक राजेश जाधव दाम्पत्य व नागरिकांनीही मोठ्या उत्साहात पदयात्रेचे स्वागत केले. परिसरात यात्रेच्या स्वागतासाठी रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. उपस्थितांनी ध्वजावर पुष्पवृष्टी केली तर महिला भगिनींनी भगव्याचे औक्षण करून रमाकांत कोंडुस्कर यांना पाठिंबाव्यक्त केला. उद्या भवानीनगर येथून शिवसन्मान पदयात्रेला सुरुवात केली जाणार आहे.
Belgaum Varta Belgaum Varta