बेळगाव : बेळगाव तालुक्यात वन्यप्राण्यांचा नागरी वस्तीत शिरकाव होण्याच्या घटनांत वाढ झाली आहे. येळ्ळूर येथे नागरी वस्तीत हरीण शिरल्याची घटना ताजी असतानाच देसूर येथे गवि रेड्यांनी गावात शिरून ग्रामस्थांना धडकी भरविल्याची घटना घडली.
मानवी वस्तीत जंगली प्राण्यांचा शिरकाव होत असल्याच्या घटनांत बेळगाव तालुक्यात वाढ होताना दिसत आहे. येळ्ळूर गावात वाट चुकून आलेले हरीण सापडल्याची घटना ताजी असतानाच आज सकाळी देसूरमध्ये दोन गवि रेड्यांनी गावात शिरून ग्रामस्थांची पाचावर धारण बसवली. हे गवि रेडे नेमके कुठून आले हे स्पष्ट झाले नाही. पण ते गावात शिरताच ग्रामस्थांनी दारे बंद करून घेतली. या दोन्ही गवि रेड्यांनी गावातील रस्त्यांवर, गल्ल्यांमध्ये काही काळ फेरफटका मारला. यावेळी ते चांगलेच दक्ष असल्याचे दिसून आले. ग्रामस्थांनी लागलीच पोलीस आणि वनखात्याला संपर्क करून त्यांचा बंदोबस्त करण्यात यश मिळवले. काही युवकांनी घराच्या छतावरून त्यांचा व्हिडिओ मोबाईलमध्ये चित्रित केला असून तो समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आहे.
Belgaum Varta Belgaum Varta